विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आणि भद्रकाली संस्थेचे प्रसाद कांबळी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस सध्या नाट्यपरिषदेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांमार्फतच करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत चर्चा झाली असून, तसे लेखी पत्र देण्यात आल्याचं कळतं.
लॉकडाउनच्या काळात मनोरंजन क्षेत्रातली नाट्यसृष्टी आणि त्याचं काम बंद आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कलाकार आणि कामगार हे गेल्या तीन महिन्यांपासून घरातच आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाने नाट्यपरिषदेला मदत निधी दिला. आणि याचसाठी आभार मानण्यासाठी प्रसाद कांबळी आणि नाटपरिषदेचे पदाधिकारी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडासंबंधी असलेल्या पत्रकार परिषदेला गेले. यावेळी उपस्थित मंडळींनी सुनील तटकरे यांची भेट घेतली. यावेळी विधान परिषदेवर राष्ट्रवादी मार्फत प्रसाद कांबळी यांना संधी देण्याची शिफारसही करण्यात आली.
नवनाथ प्रसाद कांबळी हे मच्छिंद्र कांबळी यांचे चिरंजीव आहे. मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर भद्रकाली या संस्थेची सूत्रे त्यांनीच सांभाळली आहेत. एक प्रयोगशील निर्माता म्हणून त्यांची ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी ते नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदीही विराजमान झाले.