कलाकारांना राजकारणाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेतच. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात खासदार म्हणून कारकिर्द बहरत असतानाच आता दिवंगत अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डे यांच्या पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे या राजकारणात प्रवेश करत आहेत. ७ जुलै रोजी पुण्यातील निसर्ग या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचा पक्षात प्रवेश होईल.
एका आघाडीच्या वृत्तपत्राशी बोलताना प्रिया बेर्डे म्हणतात, "ज्यांच्यामुळे पडद्यावरचा कलाकार मोठा होतो ते पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यासाठी मला काहीतरी भरीव कामगिरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग हा खुप योग्य ठरेल असं मला वाटतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, म्हणूनच राष्ट्रवादीत यायचं मी ठरवलं"
तसंच प्रिया बेर्डे म्हणतात, पुणे आणि माझं खास नातं आहे. माझी मुलं पुण्यातच शिकली. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचं कामही आम्ही पुण्यातूनच सुरु केलं. आमचं हॉटेल चखले हेसुध्दा पुण्यातच आहे. त्यामुळे इथूनच नवी सुरुवात करावी असं वाटलं. करोनानंतरच्या आणि लॉकडाऊननंतरच्या कलाकारांच्या समस्या सोडवणं हे आव्हान मी या नव्या इनिंगद्वारे स्विकारलं आहे.