सध्या करोना संकटामुळे इतर उद्योगांप्रमाणेच मनोरंजनविश्वसुध्दा जवळपास तीन महिने ठप्प होतं. आता हळूहळू योग्य ती खबरदारी व नियम पाळत शूटींगची गाडी पूर्वपदावर येण्यास सुुवात झाली आहे. अनेक मालिकांचं शूटींग सुरु होत आहे. तर अनेक हिंदी सिनेमांनी आपल्या सिनेमांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची वाट धरली आहे. पण नाटकांचं काय, नाट्यरसिकमात्र लॉकडाऊन संपून नाट्यगृह उघडण्याची वाट पाहात राहणार. त्यातून मुख्य म्हणजे कलाकारांसोबतच बॅक स्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ व इतर नाटकाते क्रू मेंबर्स अशा टीमच्या रोजगाराचा प्रश्न यामुळे आ वासून उभा आहे.
मात्र दिग्गज अभिनेते प्रशांत दामले याही परिस्थितीत कार्यरत आहेत. त्यांनी यापुढील काळासाठी काम करायला आत्तापासूनच सुरुवात केली असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक नामी शक्कल शोधून काढली आहे. फेसबुकवर नाट्यरसिकांसाठी त्यांनी एक फॉर्म शेअर केला आहे. या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून ते रसिकांची आवड निवड, त्यांना कुठल्या प्रकारची नाटकं आवडतात, ही नाटकं ते कधी आणि कुठे पाहतात अशी सर्व माहिती ते गोळा करत आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रेक्षक अभियानच सुरु केलं आहे.
या फॉर्म्सच्या सर्वेक्षणातून प्रशांत दामले नवं नाटक प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत.