By  
on  

म्हणून अवधूत गुप्तेंनी केलं अमेरिकेतील या डॉक्टरचं विशेष कौतुक

करोना विषाणूने अवघ्या जगाला वेठीस धरलं आहे. आपण अद्यापही या संकटाशी झुंजतोय.करोना कहर अद्यापही जैसे थेच आहे. डॉक्टर्स-नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिस यंत्रणा यासाठी अहोरात्र झटतेय. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी रुग्णांची सेवा करत आहेत. अशाच एक धाडसी डॉक्टराची कहाणी प्रसिध्द गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी फेसबुकच्या माध्यमातून  शेअर केली आहे. अमेरिकेत काम करणारा हा डॉक्टर चक्क “जय जय महाराष्ट्र” लिहिलेली टोपी घालून रुग्णांवर उपचार करतो, ह्याचं अवधूत गुप्तेंसोबतच तुम्हा-आम्हा सर्वांनाच कौतुक आणि अभिमान वाटेल असंच कार्य आहे. 

 

काय आहे अवधूत गुप्तेंची फेसबुक पोस्ट

आज एका छोट्याश्या गोष्टिनं तू केवळ माझाच नाही, तर प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरुन आणला आहेस!! आजच्या ह्या महामारीच्या कठीण काळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पिडीतांचे दु:ख निवारण करताना, महाराष्ट्रातून खास मागवून अमेरिकेत "जय जय महाराष्ट्र" लिहिलेली तू ही जी टोपी घातली आहेस... तो फक्त तुझ्याच नव्हे ... तर माझ्या प्रत्येक मराठी बांधवाच्या शिरावर सोन्याचा शिरपेच चढवला आहेस! आज खऱ्या अर्थानं तू समर्थांचं "महाराष्ट्र धर्म वाढवावा" म्हणजे काय हे कृतीतून सिद्ध केलं आहेस. महाराजांचे नाव, त्यांचे पुतळे, त्यांचे गडकिल्ले हे जपायला हवेतच, परंतु त्याआधी त्यांची शिकवण जपायला हवी. महाराजांची पताका हाती आणि त्यांचा टिळा कपाळी लावल्यानंतर हातामध्ये नक्की कुठले शस्त्र आणि कोणाच्या विरुद्ध घ्यायचे? याचा विचार व्हायला हवा. महाराजांच्या नावाने आज आपण जे काही करत आहोत ते महाराज कुठूनही पहात असतील तर त्यांना आपला नक्की अभिमानच वाटेल ना? आपल्याला ते आशीर्वादच देतील ना? याचे आत्मपरीक्षण सतत प्रत्येक शिवप्रेमीने केले पाहिजे. आज आम्ही नुसतेच दाढी-मिशा वाढवून महाराजांची चंद्रकोर भाळी मिरवतो, परंतु खऱ्या अर्थाने ह्या विषाणूच्या नायनाटासाठी तू त्यांचे शस्त्र हाती घेतले आहेस! ह्या टोपीचा खऱ्या अर्थाने तू मानकरी आहेस!

"वसुधैव कुटुंबकम्" म्हणणारी आपली संस्कृती! अटकेपार झेंडे फडकवल्यावर जबाबदारी संपत नाही तर सुरु होते, ‘बहुजन हिताय- बहुजन सुखाय‘ राज्य असावं, हेच आपल्या इतिहासाने आपल्याला शिकवलं आणि आज तू तेच करतो आहेस.
हे करत असताना तुला "ने मजसी ने परत मातृभूमीला.." ची साद तुझं अंतर्मन सतत घालत असणार. प्रासाद तिथे भव्य तरी तुज भारी, आईची झोपडीच प्यारी असणार! त्याशिवाय का ह्या टोपीच्या रुपाने मातृभूमिचा आशिर्वाद सतत शिरावर ठेवावासा तुला वाटावा? याखेरीज मागे आपले सगेसोयरे ह्या महामारी च्या काळात आपल्या मायदेशी सुखरूप असतील ना? याची हुरहुर सुद्धा तुझ्या मनात असणार.
पण, भावा काहीही चिंता करू नकोस! इथे आमची काळजी घेण्यासाठी तुझेच डॉक्टर बंधू-भगिनी अहोरात्र कार्यान्वित आहेत! ते तुझ्यासारखीच मेहेनत घेत आहेत.
आणि तिथे सातासमुद्रापलीकडे आपल्या भारतीय आणि त्याच प्रकारे गोऱ्या बांधवांची काळजी घेण्यासाठी एक ‘जय जय महाराष्ट्र माझा‘ लिहिलेली टोपी झटतिये, ही गोष्ट तुझ्या ह्या डाॅक्टर बांधवांना देखील निर्धास्त करेल, ह्याची खात्री बाळग.
काळजी घे भावा!! TC Bro!! जय महाराष्ट्र!!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive