Movie Review: सई, कृतीच्या बाँडिंग सोबतच पालकत्वाच्या नव्या संकल्पनेची ओळख करुन देणारा सिनेमा: ‘मिमी’

By  
on  

सिनेमा : मिमी 

कलाकार: क्रिती सॅनॉन, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, एवलीन एडवर्डस, एडेन व्हिटॉक, सुप्रिया पाठक, मनोज पहावा 

दिग्दर्शक : लक्ष्मण उतेकर 

कालावधी: 2 तास 12 मिनिट्स 

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म : जिओ सिनेमा, नेटफ्लिक्स 

रेटींग : 3.5 मून्स 

‘मला आई व्हायचंय’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमावर बेतलेला ‘मिमी’ हा सिनेमा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. सरोगसी आणि बाळाचा हक्क यावर बेतलेल्या या सिनेमात अनेक वळणं आहेत जी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. 

कथानक: सरोगेट मदरच्या शोधात भारतात आलेल्या अमेरिकन जोडप्याचा जॉन (एडेन व्हिटॉक) आणि समर (एवलीन एडवर्डस) चा ड्रायव्हर असतो भानूप्रताप (पंकज त्रिपाठी). जॉन आणि समर या दोघांसाठी पैसे घेऊन एक आरोग्यसंपन्न सरोगेट मदर शोधून देण्याचं काम भानूप्रताप स्विकारतो. यादरम्यान त्याला भेटतात मिमी (क्रिती सॅनॉन) आणि शमा (सई ताम्हणकर).  डान्सर मिमीला हिरॉईन व्हायचं असतं. पण मुंबईला जाण्यासाठी तिला पैसे हवे असतात. ही गरज ओळखून भानूप्रताप तिला पैश्याचं आमिष दाखवून सरोगेट मदर बनण्यासाठी तयार करतो. 
शमा आणि भानूप्रताप मिमीची काळजी घेत असतात. सगळं सुरळीत होत असतानाच अशी घटना घडते की, जॉन आणि समर मिमीच्या पोटातील बाळ स्विकारण्यास नकार देतात आणि अमेरिकेला निघून जातात. मिमीवर या निर्णयाचा काय परिणाम होतो? मिमी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेते का? तिचं हिरॉईन व्हायचं स्वप्न पुर्ण होतं का? जॉन आणि समरचं पुढे काय होतं. हे समजण्यासाठी मात्र सिनेमा पाहावा लागेल. 

 

 

दिग्दर्शन : टपाल, लालबागची राणी, लुका छुपी या उत्तमोत्तम सिनेमांनंतर लक्ष्मण उतेकर यांच्या खात्यात मिमीच्या रुपाने आणखी एक उत्तम सिनेमा जमा झाला आहे. सिनेमाच्या मूळ बाजाला धक्का न लावता मनोरंजन आणि परिणामकारता साध्य करण्यात उतेकर यशस्वी ठरले आहेत. 

अभिनय : या सिनेमाला अभिनयासाठी पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील. प्रत्येक कलाकार अगदी सहजेतेने वावरला आहे. मिमी साकारणा-या क्रितीने बंडखोर मुलगी ते हळवी आई उत्तम साकारली आहे. विशेषत: बाळाला जन्म देताना, अनपेक्षितपणे पदरात पडलेल्या बाळाला हातात घेतल्यावरचे तिचे हावभाव नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. या सिनेमात आणखी एक सरप्राईज पॅकेज म्हणजे शमा साकारणारी सई. शांत, समंजस, संयमी शमा सईने उत्तम वठवली आहे.

प्रत्येक प्रसंगात मिमीच्या पाठी सावलीसारखी राहणा-या शमासारखी मैत्रिण मिळाली तर लाईफ सेट आहे.  यासोबतच पंकज त्रिपाठी नेहमीप्रमाणे दिलखुलास अंदाजात वावरले आहेत. सुरुवातीला विनोदी भानुप्रताप शेवटाकडे जाताना कणखरपणाने मन जिंकून घेतो.  मनोज पहावा आणि सुप्रिया पाठक यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम साकारलल्या आहेत. या सिनेमातील आणखी एक गोड व्यक्तिरेखा म्हणजे राज. जेकब स्मिथने ती सुरेख साकारली आहे.   

 

 

संगीत: ‘परम सुंदरी’ आणि ‘रिहाई दे’ या गाण्यांना पसंतीची पावती यापुर्वीच मिळाली आहे. रिहाई देला खास ए. आर रहामान टच मिळाला आहे. तर कैलाश खेर यांच्या आवाजातही एक गाणं सजलं आहे. 

सिनेमा का पाहावा: पालकत्वाची नवी संकल्पना देणारा सिनेमा. कुटुंबाने एकत्रित बसून पाहण्यासारखा हा सिनेमा नक्कीच आहे. राजस्थानचे लोकेशन्सही उत्तम आहेत.

 

पीपिंगमून मराठी या सिनेमाला देत आहे 3.5 मून्स

 

 

 

Recommended

Loading...
Share