सिनेमा: बेलबॉटम
कलाकार: अक्षय कुमार, लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि आदिल हुसैन
दिग्दर्शित : रंजीत तिवारी
रेटिंग : 4 मून्स
हेर कथांवर बेतलेले सिनेमे हा जुना ट्रेंड वाटत असेल तर थोडं थांबा..... बेल बॉटम या सिनेमा याबाबत तुमचं मत नक्कीच बदलू शकतो. लॉकडाऊनच्या निर्बंधांनंतर रिलीज होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. 1984 मधील सत्य घटनेवर हा सिनेमा बेतला आहे. हायजॅक आणि रेक्यु यामधील थरार या सिनेमात पाहता येणार आहे. अक्षय कुमार या सिनेमात रॉ एजंट आहे ज्याचं सांकेतिक नाव ‘बेलबॉटम’ आहे. या सिनेमाच्या सुरुवातील आपल्या भेटतो अंशुल मल्होत्रा (अक्षय कुमार) जो एक अंडरकव्हर रॉ एजंट आहे. गेल्या पाच वर्षात जवळपास सात वेळा हायजॅकसारख्या घटनांना समोरं जावं लागलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी (लारा दत्ता) नव्या मिशनसाठी अंशुलची नेमणूक करतात. चार अपहरणकर्त्यांच्या तावडीतून 210 प्रवाशांची सुटका करण्यासाठी अंशुल उर्फ बेलबॉटमचा थरारक प्रवास या सिनेमात दिसला आहे.
या मिशनसाठी गरजेच्या असलेल्या धुर्त आणि धोरणी व्यक्तिचे गुण राष्ट्रीय बुद्धीबळ खेळाडू असलेल्या अंशुलमध्ये पुरेपुर आहेत. नव्या मिशनवर जाण्यासाठी तो पत्नी (वाणी कपूर) शीही खोटं बोलतो. अंशुलसाठी हे मिशन जितकं प्रोफेशन आहे तितकंच पर्सनल आहे. त्याने अशाच एका हायजॅक घटनेत घरातील जवळच्या सदस्याला गमावलेलं असतं. बेलबॉटम आपले प्लॅन्स आणि सहका-यांसह या मिशनवर निघतो. या दरम्यान फितुरीसह अनेक संकटांचा सामनाही त्याला करावा लागतो. यादरम्यान अनेक रोमांचक प्रसंगाची मालिकाच या सिनेमातून समोर येते. बेलबॉटम या सगळ्या प्रसंगातून सर्व प्रवाशांना बाहेर काढतो का हे पाहणं रंजक ठरेल.
अभिनयाबाबत बोलायचं झालं तर हा सिनेमा वरचढ ठरतो. या सिनेमात लारा दत्ताने एक वेगळीच छाप सोडली आहे. इंदिरा गांधींच्या भूमिकेत ती ओळखू न येण्याइतकी वेगळी दिसते आहे. एका 32 वर्षीय रॉ एजंटच्या भूमिकेत दिसण्यासाठी अक्षयने कोणतीच कसर बाकी ठेवली नाहीये. वाणी कपूर यात अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसते आहे. तिला यात फारसा वाव नसला तरी वाट्यला आलेलं काम तिने पार पाडलं आहे. हुमा कुरेशीनेही वाट्याला आलेल्या भूमिकेबाबत न्याय केला आहे. तर आदिल हुसैनही आपल्या भूमिकेत उत्तम दिसला आहे. त्यांची एनर्जी चाहत्यांना अवाक करेल यात शंका नाही.
या सिनेमातील स्क्रीनप्ले प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. अमाल मलिक, तनिष्क बागची, शांतनु दत्ता, कुलवंत सिंह भामरा, गुरनाजर सिंह आणि मनिंदर बुट्टर यांनी या सिनेमाला संगीताने सजवलं आहे. एक उत्तम कथानक कौशल्याने सादर करण्याचं कसब दिग्दर्शक रंजित तिवारी यांना साधलं आहे. अक्षयने या सिनेमात आपल्या अभिनयाचा एक नवाच पैलू पाहायला मिळेल.
Peepingmoon Marathi बेलबॉटमला देत आहे 4 मून्स
(शब्दांकन: अमृता पाटील-चौगुले)