By  
on  

प्रवीण तरडे आता घेऊन येणार हंबीरराव मोहितेंची शौर्यकथा

हंबीरराव मोहिते हे स्वराज्य स्थापनेतील मातब्बर नाव. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सरसेनापतीपदाची धुरा वाहणारे हंबीरराव मोहित्यांची शौर्य कथा आता सिनेमाच्या स्वरुपात समोर येणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, ढोल-ताशा पथक, भगवे ध्वज, रणशिंग, पारंपरिक लाठी – काठी, शिवकालीन मर्दानी खेळ यांच्या साथीने अवघा परिसर शिवमय झाला होता. यावेळी शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि हंबीरराव मोहिते यांचे वंशज संदीप मोहिते पाटील, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य आणि युवा नेते रोहित पवार, आमदार भीमराव तापकीर, दत्तात्रय धनकवडे, अमित गायकवाड, अभिनेता रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, महेश हगवणे, न्यूक्लियस सप्लिमेंटचे श्रीपाद चव्हाण, लीड मिडीयाचे विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

या भव्य, ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, "हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होते. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने स्वराज्याला श्रीमंत केले. हंबीरराव मोहितेंच्या नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात बघायला मिळेल. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत." तर हंबीरराव यांच्या प्रमुख भूमिकेत कोण? याचा उलगडा शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून २०१९ रोजी होणार आहे. हा चित्रपट जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल असेही तरडे यांनी सांगितले.

 

Recommended

PeepingMoon Exclusive