सिनेमा: छपाक
कलाकार : दीपिका पादुकोण, विक्रांत मैसी
दिग्दर्शिका : मेघना गुलजार
रेटिंग: 3.5 मून्स
सत्य घटनांवर आधारित सिनेमे बॉलिवूडमध्ये नवीन नाही. प्रेक्षकांनासुध्दा या घटना मोठ्या पडद्यावर पाहताना त्यातील बारकावे व सत्यतता पडताळण्यात सिनेरसिकांना आवड असते. बॉलिवूडला 'तलवार' (2015) आणि 'राजी' (2018) सारखे दर्जेदार सिनेमे देणा-या मेघना गुलजार एक सत्य घटना घेऊन प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.
अॅसिड पिडीत मुलीची सत्यकथा मोठ्या पडद्यावर मांडून तिच्या संघर्षावर प्रकाशझोत टाकण्याचा कौतुकास्पद प्रयत्न दिग्दर्शिका मेघना यांनी 'छपाक'च्या निमितेताने केला आणि दीपिका पादुकोणसारख्या प्रतिभावान अभिनेत्रीने ही भूमिका साकरण्याचंच नाही, तर या सिनेमाची सहनिर्मिती करण्याचं शिवधनुष्यसुध्दा लिलया पेललं.
१९ वर्षांची मालती. अगदी सामान्य कुटुंबात वाढलेली. तुमच्या आमच्या सारखीच. एका सामान्य युवतीवर जेव्हा अॅसिड हल्ला होतो आणि क्षणार्धात तिचं आयुष्य कसं बदलून जातं, म्हणजे छपाक. "उसने मेरी सुरत बदली है, मेरा मन नहीं" सारखे सिनेमाचे ट्रेलरमधून दिसणारे नायिकेचे संवाद प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेत्याशिवाय राहत नाहीत.
अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मीची ही खरी कहाणी. हा सिनेमा पाहताना लक्ष्मीला जीवंतपणी कशा नरकयातना भोगाव्या लागल्या हे अनुभवता येतं. स्वत:शीच नाही तर समाजासोबत लढण्याचा लक्ष्मीचा अट्टाहास दीपिकाने मालतीच्या व्यक्तिरेखेतून जीवंत केला आहे. याच संघर्षात मालतीला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव होते. या संपूर्ण कठीण आणि संघर्षमयप्रवासात मालतीसोबत खंबीर उभा राहणारा अमोल दीक्षित (विक्रांत मैसी) मुळे तिच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलतो, तिचा हा प्रवास कसा खाचखळग्यांनी भरलेला होता हे सारं तुम्हाला सिनेमात पाहणं औत्सुक्याचं ठरतं.
अभिनय :
दीपिकाच्या अभिनयाबाबत बोलायचं झालं तर अॅसिड हल्ला पिडीत तरुणीची व्यथा, तिच्या मनाची होणारी घालमेल दीपिकाने अक्षरश: हुबेहुब वठवली आहे. तिने साकरलेली मालती टचकन आपल्या डोळ्यात अश्रू आणते. अॅसिड हल्यानंतर जेव्हा मालती पहिल्यांदा तिचा चेहरा आरशात पाहते त्यावेळी ती ज्या जीवाच्या आकांतने ओरडते तो आवाज आपल्या थेट हदयात खोलवर जातो.
अभिनेता विक्रांत मेस्सीने साकारलेला (अमोल) हा अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मीच्या पाठीमागे खंबीर उभा राहणारा, तिला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारा अगदी उत्तम साकारलाय. त्याची भूमिका लक्षवेदी ठरते.
दिग्दर्शन :
मेघना गुलजार यांनी पुन्हा एकदा आपल्या अप्रतिम दिग्दर्शनाची जादू छपाकमधून दाखवून दिली आहे. सिनेमा थोड्या धिम्या गतीने पुढे सरकत असला तरी महत्त्वाच्या बाबींवर तो प्रकाशझोत टाकतो. सिनेमाचं शिर्षकगीत खुप प्रभावी ठरतं.
सिनेमा का पाहावा?
दीपिका पादुकोण स्टारर 'छपाक' हा सिनेमा मनोरंजन करणारा नसला तरी खुप काही शिकवून जाणारा आहे. कदाचित आपल्याला त्याची झळ पोहचली नसली तरी आज ब-याच महिला या जातीव्यवस्था, एकतर्फी प्रेम किंवा अन्य वादांमुळे अॅसिड हल्ल्याला बळी पडतात आणि एका नव्या संघर्षाला सामोरं जातात हे अनुभवण्यासाठी 'छपाक' नक्की पाहा.