By  
on  

मनोरंजन क्षेत्र ठप्प असतानाही या कलाकारांनी ऑनलाईन राबवले विविध उपक्रम, लॉकडाउनमध्ये असं केलं प्रेक्षकांचं मनोरंजन

सतत सक्रिय असणारं मनोरंजन क्षेत्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे ठप्प झालं होतं. सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि चित्रीकरण बंद असल्यामुळे मनोरंजन विश्वाचं काम बंद झालं होतं. मात्र अशातही स्वस्थ न बसता सतत प्रेक्षकांचं, आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी मनोरंजन विश्वातील काही कलाकार विविध उपक्रम राबवताना दिसले. यात काहींनी ऑनलाईन मार्गाचा वापर करत आपल्या कलेचं सादरीकरण केलं. 

स्पृहा जोशी (खजिना, नेटक - मोगरा )
अभिनेत्री स्पृहा जोशीने लॉकडाउनच्या काळात ‘खजिना’ हा इन्स्टाग्रामवरील लाईव्ह कार्यक्रमातून नेटकऱ्यांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमात विविध  मुलाखती आणि गप्पांचे सुंदर कार्यक्रम रंगले. या लाईव्ह कार्यक्रमात संगीत, अभिनय, लेखन अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिंच्या मुलाखती झाल्या. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसोबतची स्पृहाची लाईव्ह मुलाखत तर प्रचंड चर्चेत राहिली आणि व्हायरल देखील झाली होती. स्पृहाने या कार्यक्रमाचे अनेक एपिसोड्स केले. तर नाट्यगृह बंद असल्याने ‘नेटक’ म्हणजेच ऑनलाईन नाटकच्या माध्यमातून ‘मोगरा’ या नाटकाचे ऑनलाईन प्रयोगही सादर केले. हृषिकेश जोशीची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या नाटकात स्पृहाने राधिका ही व्यक्तिरेखा साकारली. याशिवाय स्पृहा तिच्या युट्यूब चॅनलवरही काव्यवाचन आणि विविध व्हिडीओ शेयर करते. 

सुनील बर्वे (ओएमटी - ऑनलाईन माझं थिएटर)
लॉकडाउनच्या काळात अभिनेते सुनील बर्वे यांनी त्यांच्या ‘सुबक’ या संस्थेतर्फे एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ‘ओएमटी’ म्हणजेच ‘ऑनलाईन माझं थिएटर’ असं या स्पर्धेचं नाव होतं. या ऑनलाईन स्पर्धेत अनेक कलाकार सहभागी होते. या कलाकारांच्या टीमची नावेदेखील लक्षवेधी ठरली होती. ‘2 फुल्या 3 बदाम’ हा संघ  महिनाभर रंगलेल्या या स्पर्धेचा विजयी संघ ठरला. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक उत्तमोत्तम कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत या कलाकारांच्या अभिनयाचा कस लागला आणि जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाले. तिकीट विकत घेऊन प्रेक्षकांनी या ऑनलाईन स्पर्धेचा आस्वाद घेतला. मिलिंद पाठक, भार्गवी चिरमुले, शुभंकर तावडे, नंदिता पाटकर, ऋतुराज शिंदे, संकर्षण कऱ्हाडे, ऋतुजा बागवे, आरोह वेलणकर, गौरी नलावडे, मयुरी वाघ, रसिका आगाशे, हेमांगी कवी, नेहा शितोळे, आशुतोष गोखले, विकास पाटील, संदीप पाठक, नचिकेत देवस्थळी, आरती मोरे, प्रिया मराठे या कलाकारांनी या स्पर्धेत त्यांचं अभिनय कौशल्य सादर केलं.


 
मधुरा वेलणकर (मधुरव)
अभिनेत्री मधुरा वेलणकरला नुकतच महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याहस्ते कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. याचं कारण म्हणजे मधुराने लॉकडाउनच्या काळात सुरु केलेला ‘मधुरव’ हा उपक्रम. या उपक्रमाच्या माध्यमातून नवोदित लेखक, कवी मंडळींना व्यासपीठ मिळवून देण्याचा मधुरव या कार्यक्रमाचा उद्देश होता. सोशल मिडीयावरील या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील आणि देशातील विविध वयोगटातील हौशी मंडळी त्यांच्या लिखाणाच्या वाचनातून व्यक्त झाली. 
 
 
अमेय वाघ ( वाघचा स्वॅग युट्यूब चॅनल)
अभिनेता अमेय वाघने लॉकडाउनच्या काळात त्याचं युट्यूब चॅनल सुरु केलं. सोशल मिडीयावर वाघचा स्वॅग तसाही चर्चेत होता. हा स्वॅग युट्यूब प्रेमींसाठी अमेय घेऊन आला. लेखक क्षितिज पटवर्धनचं लिखाण त्यात अमेयचा ह्युमरस अंदाज यांनी कमाल व्हिडीओ समोर आले. वाघचा स्वॅग या त्याच्या युट्यूब चॅनलवर अमेयला या ह्युमर, कॉमेडीचा तडका असलेल्या व्हिडीओंसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. 

अपूर्वा नेमळेकर (युट्यूब चॅनल)
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता ही व्यक्तिरेखा प्रचंड चर्चेत राहिली. शेवंता आणि अण्णांचे मिम्स तर सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत होते. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने लॉकडाउनच्या काळात चित्रीकरण बंद असल्याने तिचं युट्यूब चॅनल सुरु केलं. या चॅनलच्या माध्यमातून तिने विविध पात्रे साकारली. “अशी मी, तशी मी, कशी मी” म्हणत अपूर्वा विविध पात्रे साकारत होती. अपूर्वाला या युट्यूब चॅनेलसाठी तिच्या चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 

पुष्कर जोग (युट्यूब चॅनल)
अभिनेता पुष्कर जोगला नृत्याची किती आवड आहे हे त्याच्या चाहत्यांना चांगलच माहिती असेल. हीच नृत्याची आवड पुष्करच्या युट्यूब चॅनलमधून आणखी समोर आली. पुष्करने त्याचं युट्यूब चॅनेल सुरु केलं. या चॅनलच्या माध्यमातून पुष्करने विविध डान्स परफॉर्मन्स सादर केले. पुष्करने एक स्त्री वेशातील परफॉर्मन्सही सादर केला. या परफॉर्मन्सची चांगलीच चर्चा झाली.

सुबोध भावे (सुबोध दादाची गोष्ट - युट्यूब चॅनल)
अभिनेता सुबोध भावे त्याच्या युट्यूब चॅनलवरून लहान मुलांसाठी विविध व्हिडीओ करत असतो. लॉकडाउनच्या काळातही सुबोधने ‘सुबोध दादाची गोष्ट’च्या माध्यमातून छोट्या युट्यूब प्रेमींचं मनोरंजन केलं. लहान मुलांसाठी गोष्टी, स्पर्धा असे मनोरंजनात्मक व्हिडीओ सुबोधने पोस्ट केले. 

प्राजक्ता माळी (युट्यूब चॅनल)
अभिनेत्री प्राजक्ता माळीनेदेखील लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर विविध व्हिडीओ पोस्ट केले. प्राजक्तानेही युट्यूब चॅनल सुरु केलं. या चॅनलच्या माध्यमातून प्राजक्ताने उत्तम आरोग्यासाठीच्या महत्त्वाच्या टीप्स दिल्या.

जुई गडकरी (युट्यूब चॅनल)
अभिनेत्री जुई गडकरीने देखील युट्यूब चॅनलला सुरुवात केली. ‘द स्मॉल टाउन गर्ल’ असं या चॅनलचं नाव असून जुईने तिचे कुकिंग, ट्रॅव्हल व्हिडीओ या चॅनलवर पोस्ट केले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive