By  
on  

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास रुपेरी पडद्यावर, यावर्षी येणार ऐतिहासिक विषयांवर आधारित हे सिनेमे

नव्या वर्षात अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. मात्र यात ऐतिहासिक विषयांवर आधारित सिनेमे देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतील. या सिनेमांमधून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.  


 
शिवत्रयी 
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली इतिहास आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनेता रितेश देशमुख शिवरायांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सुरुवातील रवी जाधव करणार होते. मात्र मागील वर्षीच नागराज मंजूळे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. शिवत्रयी असं या सिनेमाचं नाव असणार आहे. या भव्य चित्रपटाला अजय-अतुल यांचं संगीत लाभणार आहे. याचवर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं मागील वर्षी सांगण्यात आलं होतं.

सरसेनापती हंबीरराव 
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळवणारे हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’ असं या सिनेमाचं नाव आहे. मागील वर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा अशा शब्दात सरसेनापती यांचे वर्णन करण्यात आले आहे. याचवर्षी हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जातय. या सिनेमात गश्मीर महाजनी, श्रुती मराठे यांच्यासह अनेक मराठी कलाकार आहेत. 


 
जंगजौहर
‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमांमधून शूर योद्धांचा इतिहास सिनेमारुपात घेऊन आल्यानंतर आता लेखक, दिग्दर्शक पावनखिंडीचा रणसंग्राम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. बांदल सेना आणि बाजीप्रभूंच्या अमर बलिदानाची गाथा या सिनेमातून पाहायला मिळेल. मागील वर्षी 2020 मध्ये या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमातून एका अजोड पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 2020 वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र हा सिनेमा 2021मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सिनेमात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, क्षिती जोग यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

 
पावन खिंड
मराठीशाहीचा इतिहास हा अनेक शूर योद्धांच्या परक्रमाने सजलेला आहे. हाच इतिहास रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी अनेक लेखक, दिग्दर्शकांची धडपड सुरु असते. यातच पावनखिंड गाजवणाऱ्या बाजीप्रभूंची शौर्यगाथा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी मागील वर्षी या सिनेमाची घोषणा करून पोस्टर प्रदर्शित केला होता. हा सिनेमा देखील 2020मध्ये प्रदर्शित होणार होता. तेव्हा हा सिनेमा देखील याच वर्षी म्हणजेच 2021 मध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
बघतोस काय मुजरा कर 2
दुर्गसंपदेचा वैभवशाली इतिहास अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे पुन्हा एकदा सांगणार आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमानंतर या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच ‘बघतोस काय मुजरा कर 2’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मागील वर्षी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला होता. 2021 मध्ये म्हणजेच यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं पोस्टरमध्ये म्हटलं होतं. या पोस्टरमध्ये ‘मोहीम दुर्गबांधणी’ असही म्हटलं गेलय. 

ताराराणी 
दिग्दर्शक राहुल जाधव यांनीदेखील एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा केली होती. ‘ताराराणी’ या सिनेमातून छत्रपती ताराराणी यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याशिवाय कान्होजी आंग्रे यांची शौंर्य गाथाही राहुल सिनेमारुपात घेऊन येणार आहेत. मात्र हा सिनेमा 2022 मध्ये येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive