Mother's Day Exclusive : 'कधी कधी माझी लेकच माझी आई होते' - अभिनेत्री स्नेहलता वसईकर

By  
on  

खरंतर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे हा एकच दिवस का हा प्रश्न अनेकांना सतावतो....आईपण प्रत्येक दिवशी साजरं व्हायला हवं..छोट्या-मोठ्या कृतीमधून आईला आपण ती आपल्यासाठी किती खास आहे, हे पटवून द्यायला हवं. 
केवळ पडद्यावरच नव्हे, तर पडद्यामागे देखील एक सुपरमॉम असणारी व ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारी सशक्त अभिनेत्री स्नेहलता वसईकरसोबत यंदाच्या मदर्स डे निमित्ताने पिपींगमून मराठीने केलेली ही खास खास बातचित   

 

तु अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आई साकारतेस, सोयराबाई असोत किंवा मग आत्ता ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मधील गौतमाबाई, तेव्हाची आई आणि आत्ताची आई यात काय फरक जाणवतो ?

 -  आई ही आईच असते. त्या शतकातल्या स्त्रिया आणि आत्ताची आई यांच्यात टेक्नॉलॉजीचाच काय तो फरक मला जाणवतो. सतत मुलांच्या भल्याचा, त्यांच्या योग्य जडण-घडणीचा विचार तेव्हाची आईसुध्दा करायची आणि आत्ताची आईसुध्दा तेच करते. आईचं मुलांवरचं प्रेम हे निस्सीम असतं. म्हणतात ना प्रेम हे इतिहास घडवतं, म्हणूनच आई-मुलाच्या प्रेमामुळेच जिजाऊंच्या मार्गदर्शाने शिवबांनी स्वराज्य स्थापन केले. 

 

 

तुझं आणि तुझ्या लेकीचं शौर्याचं बॉंडींग कसं आहे ? 

माझी लेक खुप समजूतदार आहे. ती फक्त सात वर्षांची आहे, पण तिच्यातील समजूतदारपणाला तोड नाही. ती इतकी मला समजून घेते की कधी कधी माझंच मला अप्रुप वाटतं, नक्की मी तिची आई आहे की ती माझी. आमच्या नात्यात एक पारदर्शकपणा आहे. जे काय आहे ते स्पष्ट असतं. ती तिच्या हातून घडलेली कुठलीच चुक माझ्यापासून लपवत नाही आणि मी पण तिला कधीच उगीचच हे करु नको, तिथे जायचं नाही अशी बंधनं घालत नाही. 
जितका वेळ एकमेकींसोबत मिळतो तो वेळ आमचा क्वालिटी टाईम असतो. माझ्या फिटनेससाठी अनेकदा माझ्या लेकीकडूनच मला मोलाचे सल्ले मिळतात आणि ते नेहमीच योग्य असतात. ती नेहमीच फिटनेससाठी मला मोटिव्हेट करते.  घरी आल्यावर माझी कधी चिडचिड सुरु असली की ती लगेच म्हणते, मम्मा तु आधी जेवून घे आणि शांत हो. म्हणजे तिला माझ्या चिडण्यावरचा उतारा अगदी तंतोतंत माहित असतो. 

 


 

आम्ही एकत्र असलो की खुप धम्माल करतो. माझ्या इन्स्टाग्रामवरचे तुम्ही जे काही फोटो पाहता त्यातले अनेक फोटो शौर्यानेच क्लिके केले आहेत. असं आमच्यातलं मैत्रीचं नातं आहे. 

 

 

सुपरमॉम स्नेहलता लेकीच्या अभ्यासाचं  शूटींगच्या बिझी शेड्यूलमधून कसं नियोजन करते ? 

-    मला असं वाटतं ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आपण ते करु शकतोच. तिच्या संपूर्ण अभ्यासाचं आठवडाभर अगोदरच मी संपूर्ण वेळापत्रक तयार करते. शूटींगसाठी घराबाहेर असूनही मी माझ्या ब्रेक टाईममध्ये शौर्याकडून तिचा अभ्यास पूर्ण करुन घेत. अर्थातच यात टेक्नॉलॉजीची खुप मदत होते. मी अक्षरश: दोन शॉट्सच्या दरम्यान जो वेळ मिळतो त्यात व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तिचं पाठांतर, गणितं सोडवणं अशा गोष्टी पूर्ण करुन घेते. वेळेचा सदुपयोगही होतो व आई घरात नसली तरी तिचा अभ्यास अपूर्ण राहत नाही. त्यामुळे इच्छा असेल तिथे मार्ग मिळतोच.

 

कामानिमित्त  किंवा शुट्टींगमुळे लेकीला वेळ देता आला नाही तर मनात कुठलं गिल्ट येतं का ? 

-    मी आधी म्हटल्याप्रमाणे माझी सात वर्षांची लेक शौर्या ही खुप समजूतदार आहे आणि हे मी माझं भाग्य समजते.  अनेकदा असं होतं की तिला मी त्यावेळेस तिथे हवी असते, पण मी कुठल्या कामात आहे हे तिला समजावून सांगते आणि ती ते मोठ्या मनाने समजून घेते. लहानपणापासून मी तिचे हट्ट सहजासहजी पुरवायचे नाही. तिचे पेशन्स आधी चेक करायचे याचा फायदा मला होतोय. त्यामुळे सहसा गिल्ट येण्याचा प्रश्न उध्दभवत नाही.

एकदा तिला एका कार्यक्रमासाठी नऊवारी साडी नेसायची होती. पण नेमकं त्याचदिवशी माझा खुप लवकरचा कॉल टाईम होता. मी तिची साडी, त्यावर घालायचे दागिने आणि इतर गोष्टींची तयारी रात्रीच करुन ठेवली. दागिने कोणते आणि कसे घालायचे याचं प्रात्यक्षिक दाखवलं. याशिवाय साडी कशी पिनअप करुन ड्रेप करायची हेही दाखवलं. शौर्याने ते सर्व अगदी व्यवस्थित लक्षात ठेवलं आणि दुस-या दिवशी आजीची मदत घेऊन ती अगदी सुंदर व मी शिकवल्याप्रमाणेच तयार झाली. तिचे ते कार्यक्रमातले फोटो पाहून मलासुध्दा खुप आश्चर्य वाटलं. 

 

 

 

लेकीला तुझी कोणती भूमिका जास्त भावते ?

 

- माझ्या लेकीला माझं प्रत्येक काम आवडतं. मग सोयराबाई असोत किंवा मग आता मी पडद्यावर साकारत असलेली गौतमाबाई. तिला माझ्या सर्व व्यक्तिरेखा खुप आवडतात. तर अळी-मिळी गुप चिळीतील माझे छोट्या दोस्तांसोबतचे सर्वच भाग ती युटयूबवर पुन्हा पुन्हा पाहते. तिला ते फार पाहायला फारच मज्जा येते. एका एपिसोडमध्ये तिनेसुध्दा हजेरी लावली होती. 

स्नेहलता सांगते,  आणि आम्ही दोघी रडू लागतो तेव्हा..

कधी कधी शौर्याला असाही प्रश्न पडतो की, मम्मा कशी रडते... मी सीन्स देताना जेव्हा रडते तेव्हा काही वापरते का..अर्थातच ग्लिसरीन वगैरा. हे सर्व जाणून घेण्याची तिला प्रचंड उत्सुकता होती. एकदा आम्ही बेडरुममध्ये गप्पा मारत होतो. तेव्हा मग मी तिला सांगितलं की मी रडण्याचे सीन्स देताना कशाच्याच आधार न घेता अश्रू आणते..आणि मी तिला ती टेक्निक दाखवली..मग काय शौर्यानेसुध्दा ती आचारणात आणत त्वरित डोळ्यात अश्रू आणून दाखवले व आम्ही दोघीही रडू लागलो. 

 

  

 

स्नेहलता सांगते,  मुलाच्या वयाएवढाच आईपणाचा अनुभव असतो. माझी लेक सात वर्षांची आहे त्यामुळे माझा आई पणाचा अनुभव त्याच वयाचा आहे. काहीही चुकलं तरी आम्ही एकमेकींना समजून घेतो. आमच्या नात्याची गंमत अनुभवायला आम्हा दोघींनाही आवडतं. 

आईचं आईपण मुलाला आणि मुलाचं मूलपण आईला काही केल्या सलत नाही आणि माय लेकराच्या नात्यामधली जादू कध्धी कध्धी सरत नाही, असं बाप पुस्तकातील कवितेच्या ओळी सांगत स्नेहलता या मदर्स डे स्पेशल मुलाखतीचा गोड शेवट करते. 

 

 

 

(  प्रज्ञा म्हात्रे )

Recommended

Loading...
Share