Birthday Special : “माधुरी म्हणजे ग्रेसफुल...” सिने विश्लेषक दिलीप ठाकूर यांच्या नजरेतून.. 

By  
on  

गेली 36 वर्षे हिंदी सिनेसृष्टीत तिने अधिराज्य गाजवलं, तिचं मोहक हास्य आणि तिच्या सदाबहार नृत्यामुळे ती असंख्य चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. नव्या पिढीसोबत ती बदलतेय मात्र हिंदी सिनेसृष्टीची ‘मोहिनी’ आणि ‘धकधक गर्ल’ ही तिची ओळख कायम आहे.  माधुरी दीक्षित नेने.. तिची सिनेकारकीर्द काही पत्रकारांनी जवळून पाहिलीय. वरिष्ठ सिने विश्लेषक दिलीप ठाकूर गेली चाळीस वर्षे सिनेपत्रकारीतेत सक्रिय आहेत. त्यांनी माधुरीची हा प्रवास जवळून पाहिलाय आणि त्याचं सखोल निरीक्षण केलय. माधुरीच्या वाढदिवसानिमित्ताने तिची अथक मेहनत, ग्रेस, सौंदर्य, व्यावसायिकता, काळानुरुप बदल करण्याचा गुण याविषयी दिलीप ठाकूर सांगतायत.. 

‘अबोध’ची पत्रकार परिषद आणि पार्ट्यांमध्ये तिची कमी उपस्थिती.. 

“माधुरी म्हणजे चार्म, माधुरी म्हणजे ग्रेसफुल... चेहऱ्यावर सदैव हास्य... ‘अबोध’ची पत्रकार परिषद मला आजही आठवतेय. 1984 साली मरीन लाईन्सच्या नटराज हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद करण्यात आली. त्याकाळी सिनेमाचे तंत्रज्ञ, कलाकार यांना मिडीयासमोर आणायचे. टी पार्टी असायची. मी तेव्हा अगदी नवीन होतो. माधुरीला यायला खूप उशीर झाला होता म्हणून सगळ्यांची चुळबुळ सुरु होती. जेव्हा ती आली तेव्हा अगदी शाळकरी मुलगी होती, तेव्हा माधुरी बारावीत होती. माझी तेव्हा माधुरीशी पहिलीच भेट झाली होती. तिच्यात आत्मविश्वासही होता आणि ती भांबावलीही होती. त्यावेळी ती आई-बाबांसोबत आली होती. ती जेव्हा केव्हा एखादा कार्यक्रम किंवा सेटवर असायची तेव्हा तिच्यासोबत कायम तिचे आई किवां बाबा असायचे. मात्र सिनेमांच्या किंवा कोणत्याही पार्ट्यांना ती फार कमी उपस्थित असायची.”

माधुरीच्या यशाची महत्त्वाची कारणं... 

“मला आजही ‘तेजाब’चा मुहूर्त आठवतोय. माझ्याकडे अजूनही ‘तेजाब’च्या मुहूर्ताची आमंत्रण पत्रिका आहे. ‘तेजाब’चा मुहूर्त झाला होता नटराज स्टुडिओत. अमिताभ बच्चन यांनी क्लॅप दिला होता आणि जितेंद्र प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. 
या आठवणीसह माधुरीच्या यशाचं महत्त्वाचं कारण सांगतो, तिच्या यशाचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिची मेहनत, ती अथक मेहनत घेते. कारण ‘तेजाब’मधील ‘एक दोन तीन’ हे जे गाणं आहे त्याचं चित्रीकरण मेहबुब स्टडिओत झालं होतं. त्यावेळी मला एन चंद्रा यांनी सेटवर बोलावलं होतं. तेव्हा मी पाहिली होती तिची मेहनत. माधुरीची मेहनत, नृत्य, व्यक्तिमत्त्वासोबत व्यावसायिकता हे देखील तिच्या यशाचं महत्त्वाचं कारण आहे. याचं एक उदाहरण म्हणजे निर्माते सुधाकर बोकाडे यांच्या ‘इज्जतदार’ चित्रपटात माधुरी होती. सुधाकर यांनी मला माधुरीविषयी सांगीतलेला एक किस्सा असा की माधुरी जेव्हा आउटडोअर चित्रीकरणाला जायची त्यावेळी निर्मात्यांकडून पैसे न घेता तिच्या लाँड्रीचं बील ती स्वत: भरायची. असेही गुण माधुरीत आहेत. मात्र तिची मेहनत हे तिच्या यशाचं महत्त्वाचं कारण आहे. 
माधुरीच्या व्यावसायिकतेचं आणखी एक उदाहरण आहे. 1987 च्या आसपास वृत्तपत्रात अशी जाहिरात आली की माधुरीला मोठ्या निर्मात्यांनी साईन केलं. गुलशन राय, दिनेश गांधी, सुभाष घई, शेखर कपूर अशी मोठी नावं त्यात आली होती. जाहिरात अशी होती की माधुरीचा लुक बदलला. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राज्याध्यक्ष यांनी तिचं फोटोशुट केलं होतं. त्यानंतर माधुरीने कात टाकली, मेकओव्हर केला होता. माधुरी पुढे सरकत गेली ती स्टार बनली. 

सुरुवातीचे माधुरीचे काही सिनेमे फ्लॉप झाले. 1988 मध्ये आलेल्या ‘तेजाब’नंतर ती स्टार झाली आणि मग काय तिची मोहिनी सगळीकडे.. नंतर 1989 मध्ये ‘रामलखन’ आला तोही हिट झाला. 1994 मध्ये आलेला ‘हम आपके है कौन’ हा तिचा हाय पॉईंट ठरला.”

गाण्यांमुळे ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली...

“चित्रपटांमधील तिच्या गाण्यांमुळे माधुरी पुढच्या पिढीपर्यंत जात राहिली. ‘तेजाब’ पासून ‘दिल तो पागल है’ पर्यंतची सुपरहिट गाणी असतील...ते ‘घागरा’ पर्यंत आत्तापर्यंतची गाणी.. गाणी, फिटनेस, लुक आणि मेहनत हे कायम लक्षवेधी ठरलं. आता या वयातही ती टेलिव्हिजनसाठी मेहनत घेतेय. तिने युट्यूब चॅनेलही सुरु केलं तिच्यात ती व्यावसायिकता अजूनही आहे.
तिने ‘आजा नचले’ सिनेमाचं अपयशही पचवलं. माधुरीच्या वयाला साजेसे सिनेमे बनत नसले तरी ती टेलिव्हिजनकडे वळली आणि तिथेही मेहनत घेतेय.”

पत्रकारांना कायम सहकार्य... 

माधुरीचं करियर जेव्हा सुरु झालं तेव्हा मिडीया खूप कमी होता. माधुरीचं मिडीयाशी सुरुवातीपासून चांगलं जमत असे. त्यामुळे तिच्या सेक्रेटरीशी बोलून ती कुठे चित्रीकरण करतेय याची माहिती आम्ही घ्यायचो. पत्रकारांना माधुरी कायम सहकार्य करायची. तिच्या मराठी प्रेमाविषयी बोलायचं झालं तर हिंदी चित्रपटांच्या सेटवरही माधुरी सुरुवातीपासूनच मराठी पत्रकारांशी मराठीतच बोलायची. आम्ही मराठी पत्रकारही ते आवर्जुन लिहायचो लेखात.  

1999 हे वर्ष या कारणासाठी ठरलं खास...

“1999 साली माधुरीने तीन, चार महत्त्वाच्या गोष्टी केल्या. तिने सोबत काम केलेल्या सगळ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना तिने खास पार्टी दिली होती. ही पार्टी तिच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आली. या पार्टीत रात्री उशीरा ती गायली पण होती. आम्हा काही पत्रकारांना या पार्टीचं खास निमंत्रण होतं. जुहूला आता नोव्होटेल असं नाव असलेल्या हॉटेलात ही पार्टी ठेवण्यात आली होती. तिने त्यावर्षी ही पार्टी का दिली याचं उत्तर मात्र नंतर मिळालं होतं. कारण त्याच वर्षी नंतर तिने डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं.” 

मराठीत खूप उशीरा पदार्पण...

“माधुरी ज्या काळात हिंदी चित्रपटात 80, 90 च्या दशकात टॉप फॉर्ममध्ये होती त्या काळात मराठीत विनोदी चित्रपटांची लाट होती. काही काळ सामाजिक चित्रपटांचीही मराठीत लाट होती. त्यात मराठीत माधुरी कुठेच फिट बसण्यासारखी नव्हती. पण माधुरीला मराठीत आणण्यासाठी तसे काही प्रयत्नही कुणी त्या काळात केले नाहीत. माधुरी जेव्हा मराठीत आली तेव्हा काळही बदलेला होता. ‘बकेटलिस्ट’ हा तिचा पहिला वहिला मराठी चित्रपट तिच्या क्लासचा वाटला नाही. मात्र त्याची कसर तिने ‘15 ऑगस्ट’ हा मराठी चित्रपट निर्मित करुन भरुन काढली. पण मराठीत माधुरी फार उशीरा आली हेही तितकच खरं. ”

बदल्यात काळानुसार माधुरीही बदलतेय... 

“बदलत्या काळाला आत्मसाद करत ते बदल माधुरीने स्विकारले. बदलत्या काळानुसात ती वेगवेगळ्या अंदाजात दिसतेय. ती कायम बदलत्या पिढीनुसार सक्रिय राहत गेली. माधुरीच्या करियरचा जेवढा अनुभव आहे त्या वयाच्या आत्ताच्या नव्या अभिनेत्री आहेत. तरीही माधुरी ही फॉर्ममध्ये आहेच. माधुरी दीक्षितविषयीचं आकर्षण हे आजही कायम आहे ते कमी झालेलं नाही. जर हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट 10 अभिनेत्रींविषयी बोलायचं झालं तर माधुरीही आहेच त्यात.”

दिलीप ठाकूर यांनी माधुरीतील, तिच्या कामातील अनेक बारकावे यात सांगीतले आहेत. त्यापैकी आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तिचं नृत्यातील अभिनय. माधुरीने तिच्या नृत्यातूनही अभिनयकौशल्य दाखवल. प्रत्येक गाण्यात ती वेगळा ग्रेस घेऊन आली. नृत्यातील तिचा अभिनयप्रकारही प्रेक्षकांना जास्त भावला.


चित्रपट, टेलिव्हीजन, डिजीटल, ओटीटी, जाहिराती, गाणी या सगळ्या माध्यमातून माधुरी तिचं विविध कौशल्य दाखवतेय त्यासाठी ती आजही तितकीच मेहनत घेतेय. म्हणून तिने सिनेकरियर सुरु केल्यापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक पिढीला माधुरी आवडते, आपलीशी वाटते. या ‘मोहिनी’ला पिपींगमून मराठीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

Recommended

Loading...
Share