‘टांग टिंग टिंगा गं टांग टिंग टिंगा... ‘अशी धुन कानावर पडली की ‘मोरूची मावशी’ आठवते आणि गालावर खुद्कन हसू उमटते. मोरुची मावशी हे स्त्री पात्र रंगवून विजय चव्हाण यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. 80-90 च्या दशकातील या गाजलेल्या नाटकाने लहान-थोर सर्वांचेच मनोरंजन केले. आता या मोरूच्या मावशीने म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांनी आयुष्याच्या रंगमंचावरुन कायमचीच एक्झिट घेतली आहे.त्यां च्या जाण्याने एक सच्चा कलाकार हरपला आहे. आचार्य अत्रे लिखित ‘मोरुची मावशी’ या नाटकातील विजय चव्हाण यांच्या स्त्री भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. विनोदाच्या अचूक टाईमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात विजय चव्हाण यशस्वी ठरले. त्यांच्या प्रत्येक विनोदाला स्वत:ची अशी एक शैली होती. दोन हजारपेक्षा जास्त प्रयोग करत ‘मोरूच्या मावशी’ने रंगभूमीवर इतिहास रचला. https://youtu.be/e-ActlWUh90 ‘तू तू मी मी’ या नाटकात 14 भूमिका साकारुन विजय चव्हाण यांनि आपल्या अभिनयाची अफलातून किमया दाखवली. या नाटकात काही क्षणांतच वेषभूषा बदलत ते विविध भूमिका अगदी लिलया साकारायचे आणि प्रेक्षक फक्त अवाक् व्हायचे. यानंतरसुध्दा ‘टूरटूरट’, ‘कार्टी प्रेमात पडली’, ‘लहानपण देगा देवा’, ‘बाबांची गर्लफ्रेंड’, ‘देखणी बायको दुस-याची’ यांसारखी त्यांची अनेक नाटकं लोकप्रिय ठरली. ‘वहिनीची माया’ सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. ‘माहेरची साडी’, ‘माझा छकुला’, ‘पछाडलेला’, ‘’बकुळा नामदेव घोटाळे’, ‘धुमाकूळ’, ‘जत्रा’ ,’जबरदस्त’, ‘वन-रुम किचन’ अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. विजय चव्हाण यांची जवळपास 40 वर्षांची अभिनय कारकिर्द होती. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यातसुध्दा आले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेसुध्दा सन्मानित केलं होतं.
Author
Team Peeping Moon
test