बॉलिवूड अभिनेता शरद केळकरचा आज वाढदिवस. आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारा हिंदीतला हा मराठमोळा अभिनेता शरद केळकर चाहत्यांच्या खुप जवळचा आहे. त्याचे आज असंख्य फॅन्स आहेत. कष्टाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची चाहत्यांना खुप उत्सुकता असते.
वाढदिवसानिमित्त पाहूया शरद केळकरच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या या दमदार भूमिका.
तान्हाजी द अनसंग वॉरिअर - छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित अजय देवगण स्टारर ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. यात अभिनेता शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या सिनेमातील त्याचा फर्सट लुक आऊट झाल्यापासूनच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. अगदी परफेक्ट व्यक्तिरेखा म्हणून सर्वत्र त्याची वाहवा झाली. इतकंच नाही तर महाराजांबद्दलचा आदरही शरदने वेळोवेळी व्यक्त केला. महाराजांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व शरद केळकरने हुबेहूब साकारत मनं जिंकली.
लक्ष्मीबॉम्ब
लक्ष्मी हा अक्षय कुमार स्टारर बहुचर्चित सिनेमा मागच्या वर्षी दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला आला. तमिळ सिनेमा कांचना हा अधिकृत रिमेक असल्याने प्रेक्षकांना अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत बरंच अप्रूप होतं. सर्वांना सिनेमा़ प्रदर्शनापूर्वी फक्त अक्षयच्या भूमिकेची उत्सुकता होती, प्रत्यक्षात मात्र अभिनेता शरद केळकरनेसुध्दा ट्रान्सजेंडरच्या लक्षवेधी भूमिकेतून रसिकांना सरप्राईज दिलं आहे.
अक्षय कुमारच्या लक्ष्मी सिनेमात तो ट्रान्सजेंडर व्यक्तिरेखा साकारतोय हे सर्वांनाच माहित होतं, परंतु शरदच्या या अनपेक्षित सरप्राईजने रसिक सुखावून गेले. खरं तर लक्ष्मी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शरद कुठेच दिसला नाही. पण सिनेमातल्या त्याच्या भूमिकेने जान आणली आणि सोशल मिडीयावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
लय भारी - संग्राम
बॉलिवूडमध्ये झळकणारा आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने लय भारी या निशिकांत कामत दिग्दर्शित सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अभिनेता शरद केळकरने यात खलनायक रंगवून आपली एक वेगळी छाप सोडली. यातला त्याचा संग्राम खुप गाजला. ह्या सुपरहिट मराठी सिनेमातली शरद केळकरची ही खलनायकी भूमिका आजह लक्षात राहते.