सिनेमे आणि वाद हे समीकरण तसं जुनच आहे. नुकताच दिपीका पादुकोणने घातलेल्या पठाणमधील भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. तर कश्मिर फाईल्समुळेसुध्दा बॉलिवूड ढवळून निघालं होतं. पण या गोष्टी झाल्या ब़ॉलिवूड सिनेमांच्या. मराठी सिनेसृष्टीतसुध्दा सिनेमे वादाच्या भोव-यात अडकल्याचं यंदा चित्र पाहायला मिळालं आहे. चला पाहुयात, कोणत्या सिनेमांमुळे नवा वाद निर्माण झाला व त्यांची चर्चा झाली.
वरणभात लोणचं, कोण नाय कोणचं
महेश मांजरेकर दिग्दर्शित वरणभात लोणचं, कोण नाय कोणचं ह्या सिनेमावरुन यंदा खुप मोठा वाद उद्भवला होता. या सिनेमातील बोल्ड दृश्ये मुख्यत्वे महिला व अल्पवयीन मुलांचे दाखविण्यात आलेली बोल्ड दृश्ये या वादाचं कारण ठरली होती. ट्रेलर रिलीज झाल्यावर लगेचच राष्ट्रीय महिला आयोगाने त्यावर नाराजी व्यक्त केली होती. ट्रेलर विरोधात महाराष्ट्रातील एका संस्थेकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली. यानंतर आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना ट्रेलरमधील काही आक्षेपार्ह लैंगिक दृश्यांना सेन्सॉर करण्यासंदर्भात पत्र लिहिले. यामध्ये सिनेमाच्या ट्रेलरमध्ये महिलांशी संबंधित आक्षेपार्ह दृश्ये आणि अश्लीलता दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता.
तसंच, ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही वयाच्या बंधनाशिवाय प्रसारित करण्यात आल्यामुळे आयोगाने त्यावरही नाराजी व्यक्त केली होती. अखेर झालेला वाद मिटून हा सिनेमा जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित झाला.
हर हर महादेव
अभिजीत देशपांडे लिखित-दिग्दर्शित हर हर महादेव ह्या ऐतिहासिक सिनेमामुळे यंदा बरेच वाद झाले. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर हा सिनेमा या वादामुळे खुप चर्चेत होता. हा पहिला पॅन इंडिया सिनेमा. सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, हार्दिक जोशी आदी कलाकारांनी यात भूमिका साकारल्या. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याच्या आरोप झाला आहे.
छत्रपतींच्या काळात कुठेही स्त्रियांचा बाजार भरला नव्हता. शिवाय शिवरायांनी कधीही अफझलखानाला नृसिहांप्रमाणे पोट फाडून मारलं नव्हतं. बाजीप्रभू आणि सिद्दी जौहर कधीही एकमेकांना भेटले नव्हते. अशा अनेक गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आल्या होत्या. या गोष्टींना स्वतः संभाजी राजे भोसले यांनी विरोध केला होता. इतकंच नाही तर जितेंद्र आव्हाड यांनी सिनेमागृहात जाऊन या सिनेमाचे खेळ बंद पाडले होते. तर मनसेने दुस-या दिवशी या सिनेमाचे स्पेशल खेळ ठेवले. या सिनेमामुळे राजकीय युध्दसुध्दा पेटलं. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांना या वादानंतर पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.
वेडात मराठे वीर दौडले सात
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शानदार घोषणा झाली. मात्र चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर एकच रान उठलं. चित्रपटातील मावळ्यांचे फर्स्ट लूक प्रेक्षकांना मुळीच पसंत पडले नाहीत. फेटे नसलेले मावळे दरोडेखोर वाटत आहेत अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे या चित्रपटातही इतिहासाची मोडतोड झाली आहे असं म्हटलं गेलं. या चित्रपटालाही संभाजी महाराजांनी विरोध केला आहे.
तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याची निवड प्रेक्षकांना अजिबात रुचली नाही. आता. तुम्हाला मराठी अभिनेता सापडला नाही का, असं विचारत अक्षयची खिल्ली उडवण्यात आली. सोबतच जेव्हा अक्षयचा शिवाजी महाराजांच्या लूकमधील पहिला व्हिडिओ शेअर करण्यात आला तेव्हा त्यात विजेचे दिवे दाखवण्यात आले. त्यामुळे शिवरायांच्या काळात वीज नव्हती हेदिखील ठाऊक नाही का असं म्हणत निर्मात्यांवर टीका करण्यात आली.