स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...असं म्हणतात ते उगीच नाही. जन्मापासून ते आपल्याला घडवण्यापर्यंत खरं तर संपूर्ण आयुष्यभर आईच आपली गुरु असते. मग तिच्यासाठी एकच दिवस का साजरा करायचा. आईसाठी तर वर्षाचे ३६५ दिवस हे मदर्स डे म्हणून सेलिब्रेट करायला हवेत.
आईसाठी आपलं मूल हे लहान किंवा मोठं कधीच नसतं..तिच्यासाठी असतं ते फक्त तिचं मूल... आई ही आईच असते मग ती ख-या आयुष्यातली असो किंवा पडद्यावरची...चला तर मग छोटा पडदा गाजवणा-या वात्सल्यमूर्ती आईंना या मदर्स डेनिमित्त जाणून घेऊयात.
आई कुठे काय करते - अरुधंती (मधुराणी गोखले-प्रभुलकर )
आईच्या आयुष्याभोवती फिरणारी व प्रत्येकाला त्या माऊलीबद्दल विचार करायला लावणारी आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रसिकांच्या भेटीला आली आणि अल्पावधितच तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. घरात दिवसभर राबून, प्रत्येकाच्या आवडी-निवडी जपणारी आई कितीही थकली तरी कुटुंबियांची काळजी घेणं थांबवत नाही. तरीही आपण नकळत हा प्रश्न विचारतो, आई कुठे काय करते. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने ब-याच काळाने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं व आपल्या वात्सल्यरुपी व्यक्तिरेखेतून रसिकांची मनं जिंकली.
अग्गंबाई सासूबाई - आसावरी ( निवेदिता अशोक सराफ)
पतीच्या निधनानंतर तान्ह्या बाळाला लहानाचं मोठं करणा-या आईची ही कथा. त्याच्या आनंदातच आपला आनंद मानणारी. बबड्या बबड्या करत इतका मोठा होऊनसुध्दा मुलाचे सर्व लाड-हट्ट पुरवणारी, तर कधी कधी त्याचे सर्व अपराध पोटात घेणारी वात्सल्यमूर्ती आसावरी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अग्गंबाई सासूबाई या झी मराठीच्या मालिकेतून जिवंत केली. या वयात आसावरीच्या सूनेने तिच्या सुखासाठी लग्नाचा घाट घातला तरी अजूनही आसावरीचा जीव मुलातच गुंतल्याचं मालिकेत पाहायला मिळतं.
आनंदी हे जग सारे- ( ऋजुता देशमुख )
आजकाल विशेष मुलांबाबत अनेक शाळा, प्रशिक्षण वर्ग आहेत. अनेकदा या मुलांनी मुख्य प्रवाहात यावं, इतर मुलांप्रमाणे शिक्षण घ्यावं यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. ऑटिस्टीक म्हणजेच स्वमग्न मुलीच्या आयुष्यात काय काय घडतं याची गोष्ट सोनी मराठीवरील ‘आनंदी हे जग सारे’ या मलिकेत पाहायला मिळते. या स्वमग्न मुलीच्या पाठीशी सतत सावलीसारखी राहणारी व या जगात मुलीला आत्मविश्वासाने घडवण्याचं शिवधनुष्य पेलणारी आई अभिनेत्री ऋतूजा देशमुखने साकारलीय व यातून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
माझ्या नव-याची बायको - राधिका (अनिता दाते )
नव-याची साथनसली तरी मुलाचं पालन-पोषण आणि त्याची जडण-घडण अगदी रितसर करणारी व त्याच्यासाठी झटणारी...कितीही संकटं आली तरी डगमगून न जाता मुलासाठी धडपडणारी आई राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दातारने माझ्या नव-याची बायको मालिकेतून साकारली आहे. पुढे स्वावलंबी झाल्यावर, स्वत:च्या उद्योगाचा कितीही मोठा पसारा असला तरी मुलाची अथर्वची सतत काळजी घेणा-या राधिकाचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे.