By  
on  

Movie Review: दलित स्त्रियांवर होणा-या अत्याचाराचं भीषण वास्तव मांडणारा '200 हल्ला हो'

कालावधी : दोन तास 

कथा -  अभिजीत दास, सार्थक दासगुप्ता, सौम्यजित रॉय

दिग्दर्शन: सार्थक दासगुप्ता

कलाकार : अमोल पालेकर, उपेंद्र लिमये, रिंकू राजगुरु, बरुण सोबती, सुषमा देशपांडे, सलोनी बत्रा, इंद्रनील सेनगुप्ता

रेटींग : 3.5 मून्स

 

आज आपण अत्याधुनिक अशा डिजीटल जगात वावरतोय.मेट्रो सिटींमध्ये तर अनेक ठिकाणी महिलांचंच वर्चस्व दिसून येतंय. त्यांनी उभारलेल्या साम्राज्यात पुरुष त्यांच्या हाताखाली किंवा बरोबरीने काम करतायत. आज अनेक क्षेत्र आहेत, जिथे स्त्रियांनी आकाशाला गवसणी घातलीय. लिंग भेद विसरुन स्त्री पुरुष समानता हा मंत्र पदोपदी जपला जातोय. पण इतकं सर्व सुरु असलं तरी अजूनही बहुतेकअंशी काही भागांत मानसिकता बदलण्याचं नावचं घेत नाहीय. जाती-पातीवरुन आजही अनेक वर्ग एकमेकांशी लढतायत. खालच्या जातीचे म्हणून हिणवलं जातंय. लेकी-सुनांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातायत. याच भगभगत्या वास्तवावर प्रकाशझोत टाकणारा आणि दलित स्त्रियांवर होणा-या अत्याचाराविरुध्द आवाज उठवणारा 200 हल्ला हो हा सिनेमा नुकताच झी ५ वर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

"२००- हल्ला हो" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, प्रेक्षकांची उत्कंठा फारच वाढली आहे. कारणही तसेच आहे, ते म्हणजे अमोल पालेकर यांचे बऱ्याच काळानंतर पडद्यावर झालेले पुनरागमन.
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, रिंकू राजगुरु, बरुण सोबती , उपेंद्र लिमये, सुषमा देशपांडे आदी कलाकारांच्या दमदार अभिनयाने ‘200 हल्ला हो’ हा सिनेमा सजला आहे. 

कथानक 
 

सत्यघटेनवर आधारित हा सिनेमा आहे. कोर्टाच्या आवारात जवळपास 200 महिलांच्या घोळक्याने एका बलात्कारी गुंडाचा  तुकडे तुकडे करुन खून केला. ह्या कथानकाची पार्श्वभूमी ही नागपुरातली आहे. नागपूरच्या राई नगरमध्ये राहणा-या दलित महिला आणि या गुंडामध्ये इतकं काय वैर होतं की त्यांनी कोर्टाच्या आवारातच त्याला यमलोकी धाडलं. त्याच्यावर खटला सुरु होता, काही दिवसांत त्याला शिक्षाही सुनावण्यात आली असती किंवा त्याची निर्दोष सुटकाही झाली असती, परंतु या स्त्रियांना कायदा का हातात घ्यावा लागला, याचं उत्तर तुम्हाला सिनेमा पाहताना मिळेल. या दिवसाढवळ्या केलेलय् गुंडाच्या खून प्रकरणात राई नगरच्या पाच दलित महिलांना पोलिस अटक करतात आणि कोर्टात त्यांच्याविरुध्दचा गुन्हा सिध्दही होतो, पण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि निर्दोष मुक्तता करण्यासाठीची एक मोठी लढाई कशी लढली जाते, हे सिनेमात पाहणं रंजक ठरेल.  

 

 

दिग्दर्शन 

सामान्य गरिब घरातल्या दलित महिला, अत्याचारी-स्त्रीलंपट गुंड आणि त्या गुंडाना पाठिशी घालणारी पोलिस यंत्रणा तर दलित महिलांच्या पाठिशी खंबीर उभी राहून त्यांच्या न्यायासाठी लढणा-या समाजातील काही व्यक्तिरेखा यांची एक सुरेख गुंफण दिग्दर्शकाने केलीय. या सिनेमाचं यश म्हणजे, अगदी साधी-सरळ गोष्ट पडद्यावर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कुठेच उगीचच गुंतागुंत किंवा कथानकाला खिळवून ठेवण्यासाठी केलेला आटा-पिटा दिसत नाही. जाती-पातीच्या मुद्द्यावर हा सिनेमा अलगद भाष्य करतो. 
 

अनेक गोष्टींतून सिनेमांतील व्यक्तिरेखांचं त्या कथानकाशी एक कनेक्शन दाखविण्यात आलं आहे. आशा सुर्वे (रिंकू राजगुरु ) या आपल्या महिला भगिनींच्या न्यायासाठी लढणा-या दलित तरुणीचं उमेश जोशी( बरुण सोबती) या ब्राम्हण समाजातल्या तरुणासोबतची हलकी-फुलकी प्रेमकथा. पण ब्राम्हण कुटंब आपल्याला कधीच स्विकारणार नाही हे हेरुन स्वत:च आशाने घेतलेली माघार हे मनाला स्पर्शून जातं. तर सेवानिवृत्त न्यायाधिश (अमोल पालेकर ) यांना एक दलित न्यायाधिश म्हणून मिळणारी उपाधी कधी कधी बरंच काही सांगून जाते. या न्यायाधिशाची त्या पाच स्त्रियांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी मनात चालेली घालमेल, त्यादरम्यान आपल्या आईची आलेली आठवण अगदी हद्यस्पर्शी वाटते. 

 

सिनेमातले एक-दोन सीन्स हे अक्षरश हदय पिळवटून टाकणारे आहेत. 


सिनेमा पाहताना आपल्याला आपल्या आजूबाजूला असंही काही सुरु आहे. याचं भान येतं सिनेमातल्या अनेक घटना आणि संवाद मन सुन्न करुन टाकतात, हेच या सिनेमाचं मोठं यश आहे. 

 

अभिनय

प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिरेखा सिनेमात जिवंत केल्या आहेत.सर्वांचंच कौतुक करायला हवं. उपेंद्र लिमये यांनी साकारलेला उर्मट, उध्दट आणि गुंडाशी हातमिळवणी करणारा पोलिस हा पाहताच क्षणी चीड आणतो. रिंकू तर आता हिंदीत चांगलीच रुळलीय. तिने साकारलेली आशा सुर्वे मनात घर करते. सलोनी बत्राने साकारलेली धडाकेबाज पत्रकार लक्षात राहते. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार, निवृत्त न्यायाधिश म्हणून अमोल पालेकर यांनी सिनेमात जान ओतलीय. तर ज्येष्ठ नाट्यकर्मी सुषमा देशपांडे यांनी साकारलेली व्यक्तिरेखा लक्षवेधी तर आहेच पण त्याहीपेक्षा बोलकी आहे. 

 

सिनेमा का पाहावा?

 

अमोल पालेकरांचं सिनेसृष्टीत पुनरागमन हे मुख्य कारण ह्या सिनेमासाठी पुरेसं आहे. पण त्याचबरोबर दलित स्त्रियांच्या अत्याचाराविरोधात एका न्यायाची अभूतपूर्व लढाई पाहण्यासाठी हा सिनेमा आवर्जून पाहावा. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive