‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारख्या सिनेमानंतर प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे घर बंदुक बिरयानी हा आणखी एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा घेऊन आले आहेत. सिनेमाच्या घोषणेपासूनच याची बरीच हवा होती. तसंच नागराज यांची आटपाट संस्था याची निर्मीती करतेय तर झी स्टुडिओजने प्रस्तुती केलीय, त्यामुळे साहजिकच सिनेमाबद्दलच्या अपेक्षा आणखीनच उंचावल्या. पण या सिनेमाचं भविष्य कसं असणार आहे, हे मायबाप प्रेक्षक हा सिनेमा पाहून ठरवतीलच.
सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. रील्सच्या 30 सेकंद ते मिनीटभराच्या दुनियेत रममाण होणारी सगळी मंडळी आहेत. ह्यात लहान-थोरसुध्दा आलेच. त्यामुळे पडद्यावर मोठा सिनेमा करण्याचं जर शिवधनुष्य एखाद्या दिग्दर्शकाने पेललं असेल तर ते तीन-पावणे तीन तासांत त्याला आपलं कौशल्य सिध्द करुन दाखवायची वेळ आहे.
प्रेम, धम्माल, भावभावना आणि एक्शन असं एखादं कम्प्लिट मनोरंजनाचं पॅकेज त्याला द्यावं लागेल आणि स्क्रिनवरचा हा सगळा खेळ फक्त त्या प्रेक्षकाला खुर्चीला कसं गुंतवून ठेवायचं ह्याचाच विचार करुन केला गेला पाहिजे. ह्यात दिग्दर्शक हेमंत अवताडे व अभिनेते नागराज मंजुळे ब-यापैकी यशस्वी झाले आहेत. घर, बंदुक आणि बिरयानी या तिन्ही विषयांची उत्तम सांगड घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्यांनी केला आहे. डाकू आणि पोलिस यांच्यातील नेहमीच्या चकमकी बरोबरच एका सामान्य तरुणाच्या जगण्याबद्दल असलेल्या आशा-अपेक्षा अशा साध्या विषयाची रुचकर मांडणी म्हणजे घर बंदूक बिरयानी.
ही कथा तीन मुख्य पात्रांभोवती फिरते. तरुण -तडफदार पोलिस अधिकारी राया पाटील (नागराज मंजुळे ), क्रूरकर्मा आणि विक्षिप्त असा डाकू गॅंगचा कमांडर पल्लम (सयाजी शिंदे ) आणि आचारी तरुण (आकाश ठोसर ). पोलिस आणि डाकूंच्या संघर्षासोबतच त्यांच्यातल्या विवध मानवी वृत्तींच दर्शन यात घडतं. महाराष्ट्रातील कोलागड परिसरात ह्या डाकू गॅंगचं वर्चस्व असतं. इथेच तडफदार पोलिस अधिकारी राया यांची बदली होते. तर ढाब्यावर काम करणारा आचारी राजू अचानक एकदा पल्लम या डाकू गॅंगच्या तावडीत सापडतो. एकाचं घर उद्ध्वस्त झालं आहे, एकाचं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि एक आपलं घर कसं उभारायचं याचं दिवास्वप्न रंगवतोय, त्यासाठी झटतोय. सिनेमात अशा अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून ते दर्शवण्याचा नागराज मंजुळे स्टाईल प्रयत्न प्रेक्षकांना नक्की भावेल. त्या त्या व्यक्तिमत्त्वाचा एकूणच जगण्याचा संघर्ष दाखवण्याठी हा सारा अट्टहास करण्यात आला आहे.
'आशेच्या भांगेची नशा भारी...' ही सिनेमाची टॅगलाईन तंतोतंत कथानकाला जुळतेय. नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांनी कथेची मांडणी फारच उत्कंठावर्धक केली आहे. त्यासोबतच असलेली गाणी मजा आणतात. सायली पाटील आणि आकाश ठोसरवर चित्रित झालेलं गुणगुण गाणं पाहून खरंच ते गुणगुणावंसं वाटतं. ए.व्ही प्रफुल्लंचंद्र यांचं जबरदस्त संगीत सिनेमात जान आणतं. पण त्यांचा थोडा अतिरेक वाटतो. सतत गाणी आल्याने कथानकाची लिंक तुटते.
मराठमोळा सिंघम म्हणून आता नागराज मंजुळे हे नाव घेतलं तर वावगं ठरणार नाही. खाकी वर्दीतला त्यांचा जबरदस्त रुबाब अजय देवगणलासुध्दा कॉंटे की टक्कर देईल. राया पाटीलचा हा डॅशिंग अवतार प्रेक्षक एन्जॉय करतात. एवढी जबरदस्त एन्ट्री आणि गाणं पाहून प्रेक्षक सुखावतील. पण साऊथच्या सिनेमांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सायली पाटील आणि आकाश ठोसर ही जोडी खुप लोकप्रिय ठरत असली तरी गाणं सोडून दोघांचे एकत्रित सीन्स नाहीत. खरंतर सायलीला खुप कमी स्क्रीन प्रेसेंस आहे. ती फक्त एक-दोन छोट्या सीन्समध्ये झळकतेय. साद्याभोळया राजूवर तिचा जीव जडलाय. तर आकाश साकारत असलेला आचारी राजू ही व्यक्तिरेखा महत्त्वाची नसली तरी खुप लक्षवेधी ठरतेय. सैराटप्रमाणेच तो इथेसुध्द् तरुणींच्या काळजाचा ठोका चुकवतोय.
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या अभिनयाला खरंच तोड नाही. काहीसा भान हरपलेला, गरम डोक्याचा कधी क्रूर तर कधी भलताच विनोदी असा कमांडर पल्लम सयाजी शिंदे यांनी जबरदस्त रंगवलाय. प्रत्येक सीनमध्ये जरी तो गंभीर असला तरी त्यात ते विनोदाची फोडणी लावतात. त्यामुळे हा पल्लव फक्त आपल्या एक्शन्सने क्रूर वाटतो. पण वागण्या बोलण्यातून त्याचा साधेपणा-भाबडेपणा जाणवतो. परिस्थितीमुळे हातात बंदूक कशी घ्यावी लागते. याचं प्रतिनिधीत्व तो करतो.
तसंच काही सीन्स आपल्याला पटतात तर काही नाही.... पोलिसच पोलिसांच्या जीवावर उठतात....हे पाहून खरंच असं होत असेल का... सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं...किंवा मग वास्तवाची प्रेक्षकाला जाणीव करुन दिली जाते...
आमदाराची माफी मागायला गेल्यावर..गाडीतली खाकी वर्दी आणण्यासाठी गेलेला राया..फ्रंट सीटजवळ कुत्र्याचं सॉफ्ट टॉय पाहून त्या कुत्र्याच्या जागी कोणाला पाहतो...असे छोटे सीन्स बारकाईने पेरल्याबद्दल दिग्दर्शकाचं खरंच कौतुक.
हलके-फुलके आणि हशा पिकवणारे संवाद ही या सिनेमाची जमेची बाजू म्हणावी लागेल. डाकूंचं वास्तव्य दाखवताना जंगलातले घेतलेले सीन्स आणि एकूणच सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. विक्रम अमलादी यांचं छायाचित्रीकरण खुपच उठावदार आहे. ड्रोन्सने घेतलेले जंगलाचे शॉर्टसुध्दा लक्षात राहतात.
सिनेमात जशा जमेच्या बाजू आहेत तशा काही उणिवासुध्दा आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची म्हणजे या संपूर्ण सिनेमाची लांबी. मध्यांतरापूर्वी काही सीन्स खुपच खोलात जाऊन दाखवले गेल्याने मध्यांतर केव्हा होईल याची प्रेक्षक वाट पाहू लागतो. तसंच उत्तरार्धातसुध्दा एक्शन सीन्समधली चकमक खिळवून ठेवणारी असली तरी कुठेच मनाला चुटपूट लागून राहत नाही, उलट कधी शेवट होईल याची वाट पाहिली जाते.
अनेक सिनेमांप्रमाणे ह्या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्येसुध्दा सिक्वलची हिंट प्रेक्षकांना देण्यात आलीय. त्यामुळे पुढे काय घडणार यासाठी पुढच्या भागापर्यंत वाट पाहावी लागेल. तूर्तास या सिनेमातल्या काही मोजक्या त्रुटी वगळल्यास ‘घर बंदूक बिरयानी’ हा सिनेमा उत्कंठावर्धक मांडणी व दिग्दर्शन, मजेशीर संवाद आणि गाण्यांसाठी एकदा नक्कीच पाहायला हवा.