मराठी सिनेमा आता कात टाकतोय असं म्हणायला हरकत नाही. वैविध्यपूर्ण विषय घेऊन दर आठवड्याला एक नवी कलाकृती प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात हजर असते.पण तिथेसुध्दा प्रेक्षकांना चॉईस असतो. कारण एकाचवेळी दोन सिनेमे तर कधी तीनसुध्दा असतातच असतात. आता अशात मनोरंजनासाठी कुठला जॉनर निवडायचा. लव्ह स्टोरी, मसाला फिल्म, की आणखी काही ज्याने तो प्रेक्षकांना रुचेल, कुठल्या वयोगटाला टार्गेट करायचं की, संपूर्ण कुटुंबाला आवडेल असा सिनेमा करायचा. यावर कधी कधी निर्माते, दिग्दर्शक-लेखकांचा कस लागतो. यंदा नव्या वर्षात बरंच काही नवं पाहायला मिळणार आहे आणि त्यात वाळवीने तुम्हाला टीझर-ट्रेलरमधून आकर्षित केलंच असेल.
परेश मोकाशी हे मराठी सिनेविश्वातलं मोठं नावं. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि व चि. सौ. का अशा विविध हटके विषयांवर जबरदस्त सिनेमे घेऊन प्रेक्षकांकडून दरवेळेस हमखास पसंतीची पावती मिळवण्यात त्यांचा हातखंडा. ह्यावेळेस त्यांच्या सिनेमाचं नावसुध्दा तितकंच हटके आहे. पत्नी मधुगंधा कुलकर्णी यांच्या साथीने त्यांनी हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणलाय. हा रहस्यपट आहे आणि मराठीत असे सिनेमे फार दुर्मिळ आहेत. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणं हा रहस्यपटांचा मुख्य हेतू असतो आणि हाच या सिनेमाचा यूएसपी आहे.
ट्रेलरमध्ये आपण जसं पाहिलं की, पत्नीला (अनिता दाते) मारण्यासाठी नवरा (स्वप्निल जोशी) प्रेयसीकडून (शिवानी सुर्वे) खुनाचे धडे व रंगीत तालिम करुन घेत असतो. पत्नीचा केलेला खुन हा आत्महत्या भासावा यासाठीचा अट्टाहास ट्रेलरमध्ये आपण पाहिलाय. पण पुढे नेमकं काय घडतं, कोण मरतं, पोलिस कोणाला पकडतात का , हा खुन आत्महत्या म्हणून सिध्द होतो का, सुबोध भावेची नेमकी भूमिका काय, ह्या सगळ्यांची उत्तरं आणि रहस्य तुम्हाला सिनेमा पाहतानाच उलगडेल.
सिनेमा सुरु झाल्यापासून ते शेवटची श्रेय नामावली येईपर्यंतच्या क्लायमॅक्स पर्यंत तो प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो. परेश मोकाशी यांचं अप्रतिम दिग्दर्शन, मधुगंधा यांचे खुमासदार संवाद लेखन आणि सुबोध-स्वप्निल यांचा दमदार अभिनय. यात शिवानी सुर्वेने तर भाव खाल्लाय. अनिता दातेच्या अभिनयाबद्दल काय बोलणार, नेहमीप्रमाणेच तिने भूमिकेला योग्य न्याय दिलाय. प्रत्येक प्रसंगातून तिने आपलं वर्चस्व सिध्द केलंय. तर नम्रता संभेरावने हास्यजत्रेसारखा इथेही आपल्या धम्माल अभिनयाचा तडका लावलाय.
अशाप्रकारचे जॉनर मराठीतच काय पण बॉलिवूडमध्येसुध्दा फार क्वचितच हाताळले जातात. तुम्ही जर हॉलिवूड किंवा जागतिक सिनेमांचे चाहते असाल तर हा जॉनर तुमच्या काहीसा परिचयाचा असेल.त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ‘वाळवी’ हा पर्वणी ठरणार यात शंका नाही.
एका पठडीतला सिनेमा यशस्वी झाला की पैसे कमविण्याच्या उद्देशाने त्याच साच्यातले सिनेमे बनवत राहायचे, ही वृत्ती आता मराठी सिनेनिर्माते-दिग्दर्शक निदान हा सिनेमा बघितल्यानंतर तरी बदलतील अशी आशा आहे. आजच्या पिढीतील मराठी प्रेक्षकांनी देखील एखाद्या वेगळ्या पठडीतील हॉलिवूड किंवा बॉलिवूड सिनेमाला जशी पसंती देतात. तशीच पसंती अशाचप्रकारच्या वेगळा विषय हाताळणा-या मराठी सिनेमांना प्रेक्षागृहात जाऊन दिली तरच मराठी दिग्दर्शक देखील यापुढे वेगळ्या वाटेवरचे सिनेमे हाताळायला धजतील आणि आपला मराठी सिनेमा पुढे जाईल. लव्हस्टोरी, डबल मिनींगचे तद्दन टुकार सिनेमांमधून मराठी सिनेसृष्टीला बाहेर पडण्याची हीच खरी वेळ आहे. अर्थातच परेश मोकाशी ह्या सर्वांसाठी आदर्श ठरतील.