By  
on  

Sarla Ek Koti Review : 'ती'च्या बाजारभावाची गोष्ट 'सरला एक कोटी'

सिनेमा सरला एक कोटी 
कथा-पटकथा-दिग्दर्शन – नितीन सुपेकर 
कलाकार – ओंकार भोजने, ईशा केसकर, छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सारनात
निर्माती – आरती चव्हाण 
वेळ – ३ तास 

यंदाचं नवीन वर्ष मराठी सिनेमांना चांगलंच मानवलंय. वेड, वाळवी या सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर लक्षणीय कामगिरी करत आपली दखल घ्यायला भाग पाडलं. तसंच पठाण सारख्या तगड्या बॉलिवूड सिनेमा समोर आपले मराठी सिनेमे यशस्वीरित्या तग धरुन आहेत. प्रेक्षकांचा सिनेमांना भरभरुन प्रतिसाद मिळतोय. 
 

दरम्यान, सरला एक कोटी हा आणखी एक सिनेमा  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नावावरुन सिनेमा खुप वेगळा वाटला पण पुन्हा एकदा स्त्रीला मध्यवर्ती ठेऊन या सिनेमाचं  कथानक गुंफण्यात आलंय. कथा पूर्णपणे ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर घडते. लहान-लहान दूरवरच्या खेड्यांत आजही स्त्रीकडे फक्त एक वस्तू म्हणून पाहिलं जातं, तिचा बाजार मांडला जातो , पैशाच्या जोरावर तिचं शोषण केलं जातं तर कधी परिस्थितीमुळे ‘ती’ ह्या मानवी मुखवटा धारण केलेल्या पुरुषी राक्षसांना बळी पडते असे  प्रकार राजसोसपणे आजही घडतायत, हे दाखविण्यासाठी ह्या सिनेमाचा घाट घालण्यात आला आहे. बहुधा शहरी लोक ग्रामीण भागातील अशा घटनांबाबत अनभिज्ञ असू शकतात. कारण अशा घटना प्रकाशझोतात येत नाहीत, आतल्या आतच दडपल्या जातात. त्यामुळेच या स्त्रीलंपटांचं जास्त फोफावतं. समाज ज्या दृष्टिकोनातून महिलेला पाहात आहे, त्याबाबत प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. बाजारूपणाची वृत्ती समाजामध्ये वाढली आहे. प्रत्येक स्त्रीला वस्तू म्हणून पाहिलं जातं आहे. ही विकृती खालच्या पातळीला घेऊन जाणारी आहे.

नवलपूर ह्या दुर्गम भागातील खेड्यात सिनेमाची कथा घडते. रोजंदारीवर काम करणारा भिकाजी (ओंकार भोजने) ह्या तरुणाला पत्ते खेळण्याचा बराच नाद असतो. भिकाजी हा अगदीच साधारण तरुण. आई मथुरा (छाया कदम ) सोबत तो या गावात काबाडकष्ट करुन जगतोय. या मायलेकरांची परिस्थिती अगदीच बेताची. योग्य वयात भिकाचं लग्न लावून देण्याचं मथुराच्या मनात असतं. म्हणूनच माहेरच्या कुटुंबातील सरला (ईशा केसकर) या तरुणीचं भिकासोबत ती लग्न लावून देते आणि तिला नवलपूरला घेऊन येते. बोल्क्या डोळ्यांची  आणि सौंदर्याची खाण असलेल्या सरलाबद्दल संपूर्ण गावात चर्चा होते. सरला साध्या-भोळ्या भिकाला कशी शोभत नाही, तिचं सौंदर्य किती अफलातून आहे याबद्दल सगळे बोलत असतात. एकदा गावातल्या ठेकेदाराच्या मनात सरला भरते आणि तिला मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. अशातच दारुच्या नशेत पत्त्यांचा डाव खेळताना डावावर लावायला काहीच पैसे किंवा संपत्ती नसल्याने सरलाला लावतो आणि तो डाव हरतो. त्यामुळे नियमाप्रमाणे भिकाजीला एक वर्षासाठी सरलाला ठेकेदाराला द्यावे लागणार असते अथवा एक लाख रक्कम भरावी लागणार असते, असा बॉंडच त्याने केलेला असतो. आता भिका हे एक लाख रुपये कुठून आमि कसे जमा करणार, दहा दिवसांच्या मुदतीत त्याला हे जमणार का, की सरला ठेकेदाराकडे एक वर्षासाठी जाणार, का हे दोघं आपल्या जीवाचं काही बरंवाईट करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल. 

सिनेमाची कथा आणि विषय खरंच वाखाणण्याजोगा आहे. दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी तो प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजही ऊसतोड कामगारांचं, रोजंदारीवर काम करणा-या स्त्री मजुरांचं ठेकेदार, सावकार अथवा सत्ताधा-यांकडून अशा प्रकारचं होत असलेलं शोषण हे सिनेमाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे.
 

कथा जरी उत्तम असली तरी सिनेमा उगीचच ताणल्यासारखा वाटतो. विषय ताणला गेल्यामुळे तो थोडा रटाळ वाटतो. सिनेमाचे संवाद खुसखुशीत आहेत. ते मजा आणतात. पण लांबी जास्त असल्याने तो पाहताना कंटाळवाणा वाटू शकतो. काही काही सीन्स हे उगीचच ज्यादा असल्याचे भासतात. ते नसते तरीही चालू शकलं असतं. एखाद्या गोष्टीचं खुपचं सूक्ष्म स्पष्टीकरण दिल्यासारखं सिनेमाभर वाटत राहतं. पण सिनेमाचा अनपेक्षित क्लायमेक्स चकित करणारा ठरतो. 

सिनेमाची गाणी, सिनेमॅटोग्राफी यांचबरोबर कलाकारांचा अभिनयसुध्दा चांगला जमून आलाय. ओंकार भोंजने ह्याने नेहमीप्रमाणेच सहज-सुंदर अभिनय केलाय तर ईशा केसकरने आपल्या सौंदर्याने आणि नजरेने घायाळ केलंय. तर छाया कदम नेहमीप्रमाणेच या सिनेमातही भाव खाऊन गेल्यात. 
ओंकार आणि ईशासाठी हा सिनेमा वन टाईम वॉच ऑप्शन नक्कीच ठरु शकतो.

 

Recommended

PeepingMoon Exclusive