चित्रपट – 83
कलाकार – रणवीर सिंग , दिपिका पादुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, ताहिर राज भसीन, जीवा, साकीब सलीम, चिराग पाटील, जतिन सरना, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खत्तर, एमी विक, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर. बद्री आणि कपील देव व मोहिंदर अमरनाथ
दिग्दर्शक – कबीर खान
रेटिंग – 4 मून्स
क्रिकेट आणि सिनेमा या दोन विषयांप्रती आपल्या देशाचं आणि देशवासियांचं विशेष प्रेम आहे. म्हणूनच बॉलिवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक कबीर खानने या दोघांचं एक परफेक्ट पॅकेज सिनेरसिकांसमोर आणलं आहे. ते पाहताना तुम्हाला क्षणोक्षणी भीती, उत्कंठा आणि अभिमानाने भरुन पावणं काय असतं हे हा सिनेमा पाहताना अनुभवता येतं. पडद्यावरची ही अप्रतिम कलाकृती पाहताना नकळतच तुम्ही टाळ्या आणि शिट्टया वाजवून आनंद साजरा करता. ही कथाच तेवढी सशक्त आणि उत्साह संचारणारी आहे. या थक्क करणा-या प्रवासाचे आपण सर्व प्रेक्षक साक्षीदारच होतो.
लंडनच्या लॉर्डस् मैदानावर टीम इंडियाने 1983 मध्ये वेस्ट इंडिजला हरवून आपला पहिला विश्वचषक जिंकला. ह्या विश्वचषकावर टीम इंडीयाचे कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपले नाव कोरले. कबीर खान दिग्दर्शित 83 हा सिनेमा ह्या विजयाचा रोमहर्षक प्रवास दर्शवतो. हा सिनेमा प्रेक्षकांना त्या कृष्णधवल काळाच्या सुवर्ण इतिहासात आपल्यासोबत प्रवास करायला लावतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
लॉर्डच्या मैदानावर 1983 साली भारताने विश्वचषक पटकावला त्याचीच ही विजयगाथा आहे. कॅप्टन कपिल देव आणि त्यांच्या टीमची ही प्रेरणादायी गाथा. पडद्यावर पाहताना क्षणोक्षणी रोमांचकारी अनुभव येतो. भारतीय टीमचे मॅनेजर मन सिंग यांचा या टीमला सल्ला दिला असतो की, परतीची तिकीटं काढून लवकरात लवकर मायदेशी परतूया. इथे आपला फक्त पराभवच होणार आहे. कारण लंडनच्या वास्तव्याच्या प्रत्येक दिवसागणिक बीसीसीआयचा बराच पैसा खर्च होत असतो.या मॅनेजरच्या महत्तवपूर्ण भूमिकेत पंकज त्रिपाठी पाहायला मिळतायत. पण टीम इंडियाचा खेळण्याचा निश्चय, खेळाप्रती असलेलं निस्सीम प्रेम, अफाट टीमवर्क आणि देशाला विजय प्राप्त करुन देण्याची असलेली उर्मी यातून हा विश्वचषक टीम इंडीयाने मायदेशी आणण्याचा पण केला. हे सगळेच बारकावे, भावना, यश-अपयाशी प्रत्येक पायरी दिग्दर्शक कबीर खानने पडद्यावर अप्रतिमरित्या सादर केली आहे.
या चित्रपटात कपिल देवची भूमिका रणवीर सिंहनं केलीय. तर, कपिल देवची पत्नी रोमी भाटियाची भूमिका दिपीका पादूकोणने साकारलीय. ्दोघांनी आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये नेहमीप्रमाणेच जीव ओतलाय. त्यांना पडद्यावर एकत्र पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. आपले मराठमोळे कलाकार आदिनाथ कोठारे ( दिलीप वेंगसकर ) आणि चिराग पाटील (संदीप पाटील) यांच्या भूमिकासुध्दा लक्षात राहतात. एप्रो फारुख इंजीनियर या क्रिकेट कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिग्गज अभिनेते बोमन इराणी पाहायला मिळतात.
कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात कौणी एक हिरो नसून ही टीम इंडियाची कथा आहे. सर्वांना सोबत घेऊन विजेतेपदावर नाव कोरण्यासाटी केलेल्या संघर्षाची ऐतिहासिक गाथा आहे. सिनेमाचं संगीत खुप जबरदस्त आहे. त्यामुळे तो पाहताना एक वेगलीच मजा येते. कपिल देव यांचा या सिनेमात एक कॅमिअओसुध्दा आहे. हा सिनेमा पाहातान एक रोमांचकारी इतिहास अनुभवण्याची संधी आपल्याला मिळते. 83 हा एक मास्टरपिसच म्हणावा लागेल