सिनेमा - झुंड
कलाकार - अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरु, आकाश ठोसर
दिग्दर्शक - नागराज मंजुळे
रेटींग- 4 मून्स
सैराट फेम मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या झुंड या बॉलिवूडपटाची जोरदार चर्चा रंगली होती. याचं कारणही तसंच होतं. महानायत अमिताभ बच्चन यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा स्लम सॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय हे झोपडपट्टीतील मुलांना एकत्र करून फुटबॉलची टीम तयार करतात. टीझरमध्येही बिग बी 'झुंड नहीं कहिए सर, टीम कहिए' असे संवाद बोलताना दिसतात. अजय-अतुलने या सिनेमाला जबरदस्त संगीत दिलं आहे तर आकाश ठोसर व रिंकू राजगुरु ही सैराट फेम जोडीी या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र झळकतेय. पण यावेळेस बॉलिवूड सिनेमात. सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे, या आठवड्यात अखेर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
सिनेमाचं कथानक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्याभोवतीच ते गुंफण्यात आलं आहे. विजय हे कॉलेजचे निवृत्त खेळ प्रशिक्षक ( प्राध्यापक ) आहेत. विजय यांनी झोपडपट्टीतील असंख्य मुलांना एकत्रित करुन फुटबॉलची एक टीम तयार केली आणि या मुलांना फुटबॉल खेळण्याचं प्रशिक्षणही दिलं. तसंच स्लम सॉकर नावाची एनजीओची स्थापनासुध्दा केली. अमिताभ बच्चन सिनेमात विजय बारसेंच्या भूमिकेत पाहायला मिळतायत.
विजय हे आपल्या निवृत्तीच्या आसपास पोहचलेले आहेत. एकदा अचानक त्यांना आपल्या कॉलनीच्या भिंतीपलीकडच्या जगात गरीब मुलं पत्र्याच्या डब्यांनी खेळताना दिसतात. तेव्हाच विजय यांच्या डोक्यात एक सुंदर कल्पना अवतरते आणि ते त्या मुलांना अर्धा तास खेळण्यासाठी 500 रुपये देण्याचं कबूल करतात. इथूनच सिनेमाचं उत्क्ंठावर्धक कथानक सुरु होतं. विजय या झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देऊन आणि त्याचं मन खेळात गुंतवून त्यांना गुन्हेगारीपासूनसुध्दा परावृत्त करताना दिसतात.
अभिनय
महानायकाच्या अभिनयाबद्दल काय लिहायचं. ..त्यांच्या दमदार अभिनयाची आपल्या सर्वांनाच प्रचिती आहे. एक निवृत्त खेळ प्रशिक्षक या भूमिकेत ते चपखल बसले आहेत. स्वखर्चाने ते गरजूंची मदत करतायत. विजय ही व्यक्तिरेखा अडचणीत असली तरी दुस-यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेली पाहायला मिळतेय. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांनी विजय बबारसे यांच्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय दिलाय. इतर व्यक्तिरेखांना खुलवण्यातसुध्दा बिग बींनी आपले 100 टक्के दिले आहेत. रिंकू राजगुरु व आकाश ठोसर यांनीसुध्दा उत्तम भूमिका साकारत लक्षवेधी परफॉर्मन्स दिला आहे. तसंच किशोर कदम आणि छाया कदम यांनी आपापल्या व्यक्तिरेखांमधून सिनेमात छाप पाडलीय. ही एक संघर्षमय आणि हदयस्पर्शी अशी कथा आहे.
दिग्दर्शन
नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चम यांना दिग्दर्शित केल्याने तमाम प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता होती. नागराज मंजुळे हे सर्वांच्या अपेक्षांवर तंतोतंत खरे उतरले आणि एक सुंदर कलाकृती त्यांनी सादर केली. गरीब-उपेक्षित समाज, जातिवाद, गुन्हेगारी जगाकडे वळणारे तरुण अश ासर्वच विषयांना नागराज यांनी सिनेमातून प्रकाशझोत टाकला आहे.