Tamasha Live Review : न्यूज चॅनेल्समधल्या ‘तमाशा’चं लाईव्ह चित्रण रुपेरी पडद्यावर

By  
on  

दिग्दर्शक  – संजय जाधव 
लेखक संजय जाधव मनिष जाधव
संवाद – अरविंद जगताप 
गीत – क्षितीज पटवर्धन 
संगीत – अमितराज आणि पंकज पडघन 
कलाकार – सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, सिध्दार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, मनमीत पेम, नागेश भोसले, भरत जाधव, मृणाल देशपांडे, आयुषी भावे, योगेश सोमण 
 

पत्रकारितेच्या जगावर फुल फ्लेज आधारित असलेला एक मराठी सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो म्हणजे संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह. याआधी पत्रकार किंवा न्यूज चॅनल्सचे सिन्स हे सिनेमात फक्त तोंडी लावण्यापुरते पाहायला मिळाले होते. पूर्वीसारखी निष्पक्ष: पत्रकारिता लोप पावत चालली असून आता पत्रकारिता म्हणजे एक ग्लॅमरस क्षेत्र झालंय.तितकंच ते चवीने कसं प्रेक्षकांचं मनोरंजन करु शकतं, त्यांना खिळवून ठेऊ शकतं, आपल्या तालावर नाचवू शकतं हे तुम्हाला ठासून सांगणा-या धाटणीचा हा सिनेमा आहे. एकूणच काय तर टीआरपीसाठी कसा खेळ रंगवला जातो हे ह्यात दाखवलं आहे. न्यूज चॅनेलच्या पडद्याआडची जी गोष्ट सामान्य प्रेक्षकासाठी अनभिज्ञ असते, ती या सिनेमाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 

बातमीमागची बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी पत्रकारिता व राजकारणाची सांगड घालण्याचा अट्टाहास यात दिसतो. विशेष म्हणजे हा म्युझिकल सिनेमा असून सूत्रधार आणि गाण्यांच्या जोडीने कथानक पुढे पुढे जातं. हा एक नवा प्रयोग यानिमित्ताने प्रथमच मराठी सिनेमामध्ये पाहायला मिळतोय, या धाडसासाठी दिग्दर्शकाचं कौतुक व्हायलाच हवं. ही महत्त्त्वकांक्षी आणि पत्रकारितेच्या वेडाने झपाटलेल्या दोन पत्रकारांच्या आपापसातल्या संघर्षाची कहाणी आहे. आपापलं स्थान टिकवण्यासाठी सुरु असलेलं त्याचं घमासान युध्द, त्यांच्यातली चुरस  नाट्यमयरित्या यात पाहायला मिळते.  

अश्विन (सचित पाटील) हा राजकीय वरदहस्त असलेल्या आणि  नंबर वनवर असलेल्या एका न्यूज चॅनेलचा नंबर वन न्यूज एंकर.  त्याच्या या पॅशनवर फिदा असलेली पत्रकारितेतली नवखी तरुणी शेफाली (सोनाली कुलकर्णी) त्याला आपला गुरु मानते. त्याच्यासोबत काम करण्यासाठी धडपडते. पण तो तिला धुडकावून लावतो आणि मग ती पेटून उठते. अशातच एक अशी घटना घडते ज्याने शेफाली पत्रकारितेच्या जगतातली राणी बनते.एक स्टार एंकर बनते. तिचा शो लोक आवर्जून पाहू लागतात. ज्या अश्विनने तिला धुडकावलं त्याच्यावरच ती मात करते. यानंतर दोघांची ब्रेकींग बातमीच्या जगतातली एक झुंजच जणू सुरु होते. एकमेकांना नामोहरम करण्यासाठी वाट्टेल तो थर गाठायची दोघांचीही 100 टक्के तयारी असते. ब्रेकिंगमध्ये सर्वात पुढे कोण याची चढाओढ पाहताना इंटरेस्ट वाढत असला तरी कुठे कुठे तरी ती अतिशयोक्ती वाटते. 

एखाद्या तमाशातल्या गण,गवळण, सूत्रधार आणि गाण्यांच्या साथीने सिनेमा पुढे जात असला तरी सततची गाणी ही सिनेमा पाहताना मध्ये मध्ये येतायत असं मध्यांतरानंतर नक्कीच वाटू शकतं. काही ठिकाणी गाण्यांशिवायसुध्दा त्या सीन्सचा उद्देश  नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकला असता.  लार्जर दॅन स्केल असा हा संजय जाधव स्टाईल भव्य सिनेमा क्लायमॅक्स दरम्यान उगीच ताणल्यासारखा भासतो. टीव्ही पत्रकारांसोबत असलेलं राजकारण्यांचं गुळपीठ आणि त्यांच्या हातातली कळसूत्री झालेले पत्रकार हे वास्तवदर्शी चित्रण सिनेमात आहे. पण टीव्ही पत्रकारीतेतला खेळखंडोबा दाखवताना त्यांच्यातले चांगले गुण, त्यांची चांगली बाजू दाखवण्यासाठी कुठेतरी हात आखडता घेतल्यासारखा वाटतो.  शांत-संयमी आणि सच्चेपणा असलेल्या पत्रकारितेचे उदाहरण देण्यासाठी योगेश सोमण यांचे सीन्स दाखवण्यात आले आहेत. परंतु ते तुलनेने फारच कमी वाटतात. त्यांनी एखादी चांगली केलेली ग्राऊंड स्टोरी दाखवून नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवता आल्या असत्या.


 एकूणच न्यूज चॅनेल्स, टीव्ही पत्रकारिता हे वार्तांकन नाही तर आता मनोरंजनपर चॅनेल्स झाले आहेत हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यासाठीच दिग्दर्शकाने हा सारा घाट घातल्याचं मध्येच वाटत राहतं. 

सचित पाटीलने महत्त्वकांक्षी वृत्तनिवेदक म्हणून संपूर्ण सिनेमात वरचढ ठरलाय. त्याची ही आत्तापर्यंतची सर्वात बेस्ट भूमिका आहे अस म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर सोनालीनेसुध्दा आपल्या सौंदर्य व डान्ससोबतच एक महिला वृत्तनिवेदक म्हणून सिनेमाभर आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. सिनेमात सिध्दार्थ आणि हेमांगीने घेतलेली विविध सोंगं अफलातून आहेत. नाटकासारखेच हे सूत्रधार प्रेक्षांसमोर येतात.त्यांनी केलेल्या जबरदस्त भूमिका तितक्याच जबरदस्त अभिनयाने खुलवल्या आहेत. आमदारबाई म्हणून मृणाल देशपांडे लक्षात राहतात. नागेश भोसले, आयुषी भावे, मनमीत पेम, पुष्कर जोग, भरत जाधव ह्यांनी आपापल्या भूमिका चोख बचावल्यात. 

मराठीतला पहिलाच सांगितिक सिनेमा म्हणून एकदा पाहायला हरकत नाही. पण हा वेगळा सिनेप्रयोग प्रेक्षकांच्या कितपत पचनी पडतो हे तेच ठरवतील. 

Recommended

Loading...
Share