सिनेमा – अनन्या
कथा-दिग्दर्शन आणि संवाद – प्रताप फड
कलाकार – ह्रता दुर्गुळे, सुव्रत जोशी, अमेय वाघ, योगेश सोमण, सुनील अभ्यंकर, चेतन चिटणीस, रुचा आपटे , रेणुका दफ्तरदार
कालावधी – २ तास
रेटिंग – 4 मून्स
एक सुखी परिपूर्ण आयुष्य आपल्याला जगता यावं यासाठी प्रत्येक जण सतत ध़डपडत असतो. स्वप्नांचा मागोवा घेत असतो. त्यादिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो,हळूहळू आपण शिखरावर पोहचणारच असतो इतक्यात नियतीच्या मनात वेगळंच शिजत असतं. काहीतरी अघटित घडतं आणि सगळ्या स्वप्नांचा चुराडा होतो. इथूनच सुरु होतो संघर्षाचा नवा प्रवास. अनेक खाचखळगे येतात, खचून जातो मन अस्वस्थ होतं. सगळं संपलं ह्या भावेनेने घेरले जातो.पण ह्यातसुध्दा नवी उर्जा घेऊन पुन्हा उभं राहण्यासाठी धाडस लागतं आणि नवी आव्हानं पेलण्याची ताकद. तरच तुम्ही जग जिंकू शकता, आणि एकदा का ठरवलं की मग काहीच अशक्य नसतं. सर्व काही तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. याच धर्तीवर आधारित अनन्या हा प्रेरणादायी सिनेमा बेतला आहे.
आपल्यापैकी अनेकांनी अनन्या हे नाटक पाहिलं आहे, त्यामुले अनन्याचं कथानक त्यांच्यासाठी नवीन नाही. तसंच सिनेमाच्या ट्रेलरमधूनसुध्दा ब-याच गोष्टींचा अंदाज बांधता येत असल्याने एकूणच कथानकाची कल्पना प्रेक्षकांना येते. मग आता सिनेमाबाबत बोलायचं झालं तर सिनेमाच्या मांडणीकडे आवर्जून लक्ष जातं आणि ती अचूकच ठरते. एका सामान्य मुलीचा प्रेरणादायी प्रवास सिनेमात अनुभवता येतो.
तुमच्या आमच्या सारख्याच एका सामान्य कुटुंबातील मुलीची अनन्याची ही कहाणी आहे. सिनेमाची पार्श्वभूमी पुण्याची आहे. अविनाश देशमुख ( योगेश सोमण) हे पुण्यात आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास असतात. धनंजय देशमुख (सुव्रत जोशी) आणि अनन्या देशमुख (ह्रता दुर्गुळे). अविनाश देशमुख हे महापालिकेत काम करणारे कक्षाधिकारी असतात. तर मोठा मुलगा धनंजय हा एमबीए डिस्टिंक्शन असून नोकरीच्या शोधात असतो. तर त्याची धाकटी बहिण साधी-सरळ आणि कशाचाच हव्यास नसलेली अनन्या एम ए गोल्ड मेडेलिस्ट असते. सीए होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असते. वडिलांची प्रचंड लाडकी असते.
संसाराचा डाव अर्ध्यावर सोडून गेलेल्या पत्नीनंतर अविनाश देशमुख मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी-सुखासाठी सतत झटत असतात. सीएचा अभ्यास सुरु असतानाच अनन्याच्या बाबांना तिच्यासाठी शेखर सरपोतदारचं स्थळ सांगून येतं. श्रीमंत आणि उच्चशिक्षित घराणं पाहून अविनाश देशमुख हरपून जातात. अनन्याचं तिथेच लग्न लावून देण्याचं ठरवतात. परिक्षेपूर्वी फक्त साखरपुडा उरकला जातो. अनन्या- शेखर दोघंसुध्दा खुश असतात. सर्वकाही अगदी दृष्टलागण्यासारखं असतं. लेकीला शिक्षणासोबतच उत्तम घराण्यात नांदायला पाठवतोय या कल्पनेने अविनाश देशमुखांचा आनंदच गगनात मावत नसतो. पण अचानक एके दिवशी एक अपघात घडतो आणि सगळंच विस्कटतं. अनन्याला या अपघातात आपले दोन्ही हात गमवावे लागतात. इथूनच सुरु होतो तिच्या जगण्याच्या संघर्षाचा प्रवास.
अनन्याला आपल्या रोजच्या दिनचर्येसाठीसुध्दा दुस-यांवर अवलंबून रहावं लागतं. पण या सगळ्यांवर ती कशी मात करते, जिद्दीने कशी स्वत:च्या पायावर उभी राहते. यात तिला पुन्हा जगण्याचं बळ कोण देतं, तिची सावली कोण बनतं, ती सीए होते का, तिचं लग्न शेखरसोबतच होतं का, की ती दुस-याच कोणाच्या प्रेमात पडते या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला सिनेमा पाहताना मिळतील. महत्त्वाचं म्हणजे सिनेमा पाहाताना आपसूकच तुमच्या डोळ्यात अश्रू तरळतील.
दिग्दर्शन
सिनेमाचा पडदा उगघडतो तेव्हा भूतकाळ आणि वर्तमानकाळाची हळूवार सांगड घालून कथानक तुमच्यासमोर दिग्दर्शक घेऊन येतो. कथेची गरज ओळखून प्रत्येक सीन उलगडला जातो. साधी सरळ गोष्ट समोर येते. नायिकेची प्रत्येक हालचाल बारकावे अचूक टिपले जातात. ठरवलं तर सगळंच शक्य आहे हा संदेश पोहचवतानासुध्दा या प्रवासातील यातना, दु:ख हे सगळं दिग्दर्शकाने अगदी व्यवस्थित मांडलं आहे. उगीचच काही ओढून-ताणून दाखवलं नाही. हात गमावल्यानंतर मासिक पाळी आल्याने हतबल झालेल्या अनन्याचा सीन वास्तवदर्शी तर आहेच, पण तो हदयाला भिडतो. पुढे तिच अनन्या रात्री बाबांच्या अंगावर पांघरुण घालते, भावाच्या कानावरचे हेडफोन्स काढते. ह्या सींन्सच्या उत्कृष्ट चित्रणासाठी दिग्दर्शकाचं कौतुक व्हायलाच हवं. हलके-फुलके संवाद ही या सिनेमाच्या जमेची बाजू. कथा-दिग्दर्शन, संवाद, सिक्रीनप्ले या सर्वच जबाबदा-या प्रताप फड यांनी लिलया सांभाळल्याचं पडद्यावर स्पष्ट दिसतं.
संगीत
सिनेमाच्या कथानकाशी जुळणारं संगीत तो खुलवण्यात महत्त्वाचा भाग ठरतो, न कळता या हळूवार गाण्यासोबतच बॉलिवूडचे प्रसिध्द गायक विशाल ददलानी यांनी गायलेलं तू धगधगती आग हे जोशपूर्ण गाणं जबरदस्त झालंय.
अभिनय
अभिनेत्री ह्रता दुर्गुळेचा हा पहिलाच सिनेमा आहे, असं अजिबात जाणवत नाही. तिने संपूर्णपणे ह्या भूमिकेसाठी स्वत:ला दिग्दर्शकाच्या स्वाधीन केलंय. अनेक ठिकाणी ह्रताच्या डोळ्यातच अनन्याची हतबलता, आनंद सगळं काही सामावल्याचं पाहायला मिळालं आहे. भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत पडद्यार दिसतेय. सुव्रत जोशीने मोठ्या भावाची भूमिका सहज साकारलीय तर वडिलांच्या भूमिकेला योगेश सोमण यांनी पुरेपूर न्याय दिलाय. वडीलांची हतबलता, मुलांसाठी तुटणारा जीव हे सगळं त्यांनी भूमिकेतून जीवंत केलंय.
एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख करायला लागेल तो म्हणजे सहाय्यक भूमिकेत असलेली ऋचा आपटेचा. मैत्रिण म्हणून तिने साकारलेली प्रियांकाची भूमिका अप्रतिम आहे. संकटातही साथ न सोडणारी. जिद्दीने जगण्याच नवं बळ देणारी आणि सतत सावलीसारखी अनन्याची सोबत करणारी प्रियांका तिने खुमासदार साकारलीय, दोघींचे प्रत्येक प्रसंग बोलके आहेत.
सिनेमा का पाहावा?
विविध कथानकांचं उत्तम सादरीकरण हे मराठी सिनेमांचं वैशिष्ट्य नाकारता येणं शक्य नाही. अनन्या हा सिनेमा त्यापैकीच एक. ही फक्त सिनेमाची गोष्ट नसून वास्तवदर्शी समाजातील अनेकांची कहाणी आहे. अनेक जण या ना त्या कारणाने जगण्याचं बळ गमावतात. पण त्यातून जिद्दीने उभं राहतात आणि स्वप्नांना नवा आकार देतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच एकदातरी अनन्याचा हा प्रेरणादायी प्रवास आवर्जून अनुभवावा.