By  
on  

‘शिवप्रताप -गरुडझेप’: शिवछत्रपतींच्या बुध्दीचातुर्य आणि पराक्रमाची यशोगाथा

सिनेमा - शिवप्रताप गरुडझेप 

पटकथा -संवाद -  डॉ. अमोल रामसिंग कोल्हे 

दिग्दर्शन - कार्तिक केंढे

कलाकार - डॉ. अमोल कोल्हे, यतीन कार्येकर, प्रतिक्षा लोणकर, मनवा नाईक, हरक भारतीय, हरीश दुधाडे, शैलेश दातार, पल्लवी वैद्य, अलका बडोला कौशल

 

 

छत्रपती शिवाजी महारांचा दैदिप्यमान इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर जगभर कुतुहल आणि अभ्यासाचा विषय ठरतो. महाराजांचं संपूर्ण आयुष्य थरार आणि अनेक नाट्यमय घडामोडींनी व्यापलेलं होतं. त्यांची आग्रा भेट आणि तिथून झालेली सुटका ही त्यांच्या एकूणच कारकिर्दीतली महत्त्वाची घटना मानली जाते. ही घटना इतकी नाट्यमय आणि थरारक आहे, की अनेक इतिहासकारांबरोबरच लेखक, कादंबरीकार, नाटककार आणि सिनेजगताला गेली अनेक वर्ष ही भुरळ पाडून  आहे. 

महाराजांच्या आग्रा भेटीची आणि तिथून चमत्कारिकरित्या झालेल्या त्यांच्या सुटकेचे अनेक पैलू आणि संदर्भदेखील आहेत. तसेच अनेक इतिहासकारांमध्ये देखील याबाबत मतभेद आहेत. तरीदेखील ही अभूतपूर्व घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडली आहे , ह्यावर मात्र कुणाचही दुमत नाहीय. बुध्दीचातुर्य, धैर्य आणि योग्य डावपेच आखून महाराजांची आग्र्याहून सुटका झाली, तरीही महाराजांच्या जीवाची बाजी  लागलेल्या या मोहिमेत कुठल्याही शस्त्रांचा वापर  वा रक्तपात झाला नसल्याचं इतिहासकारांचं मत आहे. आजवर अनेक ऐतिहासिक नाटक व सिनेमांमध्ये हा विषय हाताळण्यात आला आहे.


मागील काही वर्षात मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक सिनेमांची एक लाट उसळली आहे. त्यामुळे साहजिकच महाराजांची आग्रा भेट सिनेमारुपात भेटीला येणार हे ओघाने आलंच. छत्रपती शिवाजी महारांजांच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावरुन आपली छाप पाडणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराजांची ही  ‘गरुडझेप’ मोठ्या पडद्यावर आणलीय. ऐन दस-याच्या शुभ मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता होती. यामागचं मुख्य कारणं म्हणजे, आग्र्याच्या लाल किल्ल्यावर जिथे हा प्रत्यक्ष थरार घडला, ज्या वास्तूने तो अनुभवला तिथेच शिवप्रताप गरुडझेप सिनेमाचं शूटींग पार पडलं आहे.

पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज आणि मुघल सम्राट औरंगजेब यांची भेट घडवून आणण्यासाठी मिर्झाराजे जयसिंह आग्रही होते. औरंगजेबच्या 50 वा वाढदिवस जवळ आल्याने या खास निमित्ताने महाराज आणि  औंरगजेबची भेट व्हावी असा मनसुबा ठरला. त्यामुळे केवळ नाईलाजास्तोव महाराजांना आग्रा मोहिमेची योजना आखावी लागली. अर्थातच ह्या संपूर्ण प्रकरणात महाराजांची दुरदृष्टी, चाणाक्षपणा ह्याचा अनुभव आपल्याला पावलोपावली येतो, पण प्रत्यक्षात सिनेमात ही आग्रा मोहिम, त्यांच्या आग्रा सुटकेचा थरार कशाप्राकरे साकारण्यात आला आहे , हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जावं लागेल. 

डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पड्द्यावर नेहमीप्रमाणेच सर्वौत्तम साकारले आहेत. उत्कृष्ट संवाद फेक आणि भाषा कौशल्याच्या जोरावर त्यांनी चांगलीच  छाप पाडलीय. त्यांचा पडद्यावरचा महाराज म्हणून वावर सुखावून जातो. तरीसुध्दा एक सामान्य प्रेक्षकाला  सिनेमात सतत वापरण्यात आलेली संवांदातली अलंकारिक भाषा काहीशी पचनी पडण्यास जड जाते. तर दुसरीकडे संजय जाधव यांची सिनेमॅटोग्राफी मनं जिंकते. संगीत हे प्रसंगाना साजेसं झालं आहे. एक भव्य-दिव्य कलाकृती पाहण्याचा अनुभव तुम्हाला सिनेमा पाहताना मिळतो. 


 

मुघल सम्राट औरंजेबची छबी जी आपण अनेक सिनेमांमधून अनुभवलीय, तशीच यासिनेमात देखील आपल्याला ती पाहायला मिळते. ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर यांनी औरंगबजेब आजवर अनेकदा साकारला असला तरी ह्या सिनेमातला त्यांचा औरंगजेब मात्र विशेष भाव खाऊन जातो. त्यांच्या नजरेतला अभिनय ही त्यांची खासियत आहे, त्यामुळे औरंगजेबचा दरारा व त्याची छबी पडद्यावर जिवंत केलीय. तर शंभुराजांच्या भूमिकेतील हरक अमोल भारतीय हा बालकलाकार आपल्या अप्रतिम अभिनयाने व उत्तम संवादफेकीमुळे आपली दखल घ्यायला भाग पाडतो. अभिनेता हरीश दुधाडे याने साकारलेला रामसिंह राजे लक्षवेधी ठरला आहे. तर अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर यांनी राजमाता जिजाऊसाहेबांचा करारी बाणा तंतोतंत आपल्या भूमिकेतून जिवंत केला आहे. 
शिवचरित्रातील ही अभूतपूर्व घटना प्रत्यक्ष अनुभवयाची असेल तर मोठ्यांसोबतच आजच्या युवा पिढीने आवर्जुन हा सिनेमा एकदा जरुर पाहावा.

 

Recommended

PeepingMoon Exclusive