वेड :
दिग्दर्शक : रितेश विलासराव देशमुख
निर्माती : जिनिलीया देशमुख
गीतकार : गुरु ठाकूर, अजय अतुल
पटकथा : ऋषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख
संवाद : प्राजक्त देशमुख
अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित पहिला मराठी सिनेमा ‘वेड’ची गेले कित्येक दिवस वेड्यासारखी चर्चा सुरु होती. सिनेमाचा पोस्टर, टीझर, गाणी ते ट्रेलर याचबरोबर रितेश-जिनिलियाचा मराठी सिनेमा म्हणून हा सिनेमा सतत प्रकाशझोतात होता.. पण यातली प्रमुख गोष्ट प्रकर्षाने सिनेमाकडे आकर्षित करत होती, ती म्हणजे रितेशची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचं मराठी पदार्पण. दिवसेंदिवस सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचवत होती. अखेर आज ‘वेड’ प्रदर्शित होतोय. दाक्षिणात्य सुपरहिट सिनेमा ‘मजली’ वरुन वेड हा प्रेरित आहे.
प्रेम कहाणी म्हटलं की, नायक-नायिका आले आणि मग एखाद्याच्या घरातून विरोध किंवा मग गरीब-श्रीमंत भेदभाव. एखादा खलनायक, तीन-चार गाणी व सर्व अडचणींवर मात करुन प्रेमपरिक्षेच्या दिव्यातून जाणं आलं. अशा सगळ्या टिपिकल गोष्टींना वेगवेगळ्या साच्यात टाकून सादर करणं आलं. पण ‘वेड’ यापेक्षा वेगळा ठरतो. यात एक प्रेमत्रिकोण आहे आणि तो कसा पूर्ण होतो याची ही कहाणी आहे. जोडीला तमाम भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच क्रिकेट यात कथानकाशी गुंफण्यात आलाय.
प्रेमातला वेडेपणा काय करु शकतो हे दाखवणारा प्रेमत्रिकोण यात आहे. ही गोष्ट आहे, सत्या,निशा व श्रावणीची. अलिबागच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट घडते. सत्या (रितेश देशमुख ) हा तरुण मोठा क्रिकेटर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतो. क्रिकेटच त्याच्यासाठी सर्वकाही असतं. तो एक निष्णांत क्र त्याचे वडील (अशोक सराफ) रेल्वेत टीसी असतात. अगदी सामान्य मध्यमवर्गीय आयुष्य तो जगत असतो. क्रिकेटमध्ये दंग असलेल्या सत्याच्या आयुष्यात वा-याची हळुवार झुळूक जशी येते तशी निशा (जिया शंकर) अचानक त्याच्या आयुष्यात येते. त्यांच्यातील हळूवार मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ लागतं. सत्या आणि निशा एकमेकांमध्ये हरवून जातात. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. सत्या आणि निशा दोघांमध्ये असं काहीतरी एिकेटर असतो.क वादळ येतं, ज्यामुळे दोघंही कायमचे एकमेकांपासून दूर जातात. या घटनेनंतर गोष्ट एक दशक पुढे सरकलेली असते.
तेव्हा त्यात गेल्या सात वर्षांपासूनच सत्या सोबत लग्न करुनही ती त्याची पत्नी झालेली नसते त्या श्रावणीचा (जिनिलिया देशमुख) प्रवास पाहायला मिळतो. श्रावणी ही सत्या सोबतच शाळेत शिकलेली असते. बालपणापासूनच ती त्याच्यावर जीव ओवाळून टाकते. पण त्याला ते कधीच जाणवलं नसतं. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता व्यसनाच्या आहारी गेलेल्या व चोवीस तास त्यातच घालवत असलेल्या सत्या सोबत श्रावणी लग्न का करते, जवळ असूनही तो तिच्या सोबत नसतो तो निशाच्याच आठवणीत दंग असतो. तरीही श्रावणी सत्यावर वेड्यासारखं प्रेम करते. प्रेमातला हा विरह आहे, त्याग आहे, समर्पण की मग वेड आहे...सत्याला निशा मिळणार की मग श्रावणीला सत्या मिळणार...श्रावणी सत्याला व्यसनातून पुन्हा कसं बाहेर काढणार..त्याचं प्रेम ती मिळवणार का वेड्या प्रेमाचा प्रवास कुठल्या वळणावर जाऊन पोहचणार ..हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी वेड पाहावा लागेल.
बॉलिवूड आणि मराठीत आपली अभिनय कारकिर्द गाजवल्यानंतर दिग्दर्शनात रितेश देशमुखने दमदार पदार्पण केलंय असं म्हटल्यास बिल्कुल अतिशयोक्ती ठरणार नाही. रितेशच्या नजरेतून त्याने एक कलाकृती मांडलीय. ज्यात, प्रेम आहे, फॅमिली ड्रामा, गाणी, थोडं सस्पेन्स आहे आणि एक उत्कंठावर्धक क्लायमॅक्स. अलिबागसारख्या निसर्गरम्य परिसरात ह्या सिनेमाचं शूटींग पार पडल्याने. ह्या सिनेमाला आणखी एक सुंदर टच मिळालाय. फ्रेम टू फ्रेम सिनेमा पाहायला छान वाटतो. सिनेमाचा पूर्वार्ध थोडासा रेंगाळल्यासारखा आहे. कथानक मध्यातरानंतर जोर घेतं. त्यामुळे सिनेमा जरा कंटाळवाणा वाटू शकतो. रितेशने दिग्दर्शनासोबतच आपल्या अभिनयाची जादूही दाखवलीय.
जिनीलीयाचा अभिनय आणि हावभाव याला तोड नाही, पण तिची संवादफेक अमराठी असल्याचं सतत जाणवतं. जियाने निशा म्हणून एक नाजूक-साजूक तरुणी आणि प्रेमिका छान साकारलीय. रितेशच्या व्यक्तिरेखेसोबत सतत सावलीसारखा असणा-या त्याच्या मित्राच्या भूमिकेतील शुभंकर तावडे लक्षात राहतो. शुंभकरने त्याची भूमिका तंतोतंत साकारलीय. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबद्दल काय लिहावं, ते आपल्या प्रत्येक कलाकृतीतून व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांना फक्त एक सुंदर पर्वणी देतात. तर विद्याधर जोशी यांनीसुध्दा सिनेमात अशोक मामांलोबत आपल्या अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी रंगवलीय. विशेष लक्षात रहाते ती सिनेमातील बालकलाकार खुशी. पडद्यावरचा तिचा बिनधास्त-बेधडक अदांज प्रेक्षकांना तिची दखल घ्यायला भाग पाडतो. ही छोटा पॅकेट बडा धमाका सगळ्यांची मनं जिंकते.
अजय-अतुल या संगीतकार जोडीबद्दल आता इतकी प्रशंसा झालीय की त्यांच्या कौतुकासाठी शब्दच नाहीत. वेड तुझे, बेसुरी .., सुख कळले.. आणि वेड लावलंय ही सर्वच गाणी सुपरहिट ठरलीयत.