कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर कला विश्वाचं चित्रीकरणही ठप्प झालयं. त्यामुळे काही मालिकांचे रिपीट टेलेकास्ट सध्या टेलिव्हिजनवर पाहायला मिळतय. त्यातच दुरदर्शनने रामायण, महाभारत, शक्तीमान या गाजलेल्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यात. त्यामुळे टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी बरेच पर्याय सध्या उपलब्ध आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांच्या शौर्याची गाथाही पुन्हा टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. कारण ‘राजा शिवछत्रपती’ ही गाजलेली मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 3 एप्रिलपासून दररोज सायंकाळी 5.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ही लोकप्रिय मालिका पाहायला मिळेल. लोकाग्रहास्तव ही मालिका पुन्हा लॉकडाउनच्या निमित्ताने प्रसारित करण्यात येत आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केलं आहे. अजय अतुल यांनी या मालिकेचं शिर्षकगीत संगीतबद्ध केलय. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज, मृणाल कुलकर्णी यांच्या जिजाऊ, अविनाश नारकर यांचे शहाजी राजे, यतीन कार्येकर यांचा औरंगजेब आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हेच सोनेरी क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.
या मालिकेसोबतच याच वाहिनीवरी 'आंबटगोड' ही मालिकाही पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे.