लॉकडाउनच्या या काळात आपणजुगाड करायला शिकलोय. मात्र सोनी मराठी वाहिनीने असं काही करुन दाखवलय जे टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. लॉकडाउनमध्ये एकीकडे चित्रीकरण बंद असताना कलाकारांकडून घरातूनच चित्रीकरण करून नव्या मालिकेसह ही वाहिनी भेटीला येत आहे. ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ असं या मालिकेचं नाव आहे.
नुकत्याच या मालिकेच्या टीमसह ऑनलाईन पत्रकार परिषदही करण्यात आली. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात अशा पद्धतिची ऑनलाईन पत्रकार परिषद करणारी ही पहिलीच वाहिनी ठरली आहे. यावेळी या पत्रकार परिषदेला निर्माते श्रीरंग गोडबोले, लीना भागवत, मंगेश कदम, समीर चौगुले उपस्थित होते. शिवाय सखी गोखले आणि सुव्रत जोशी या प्रेस कॉन्फरन्ससाठी लंडनहून जोडले गेले. अशा पद्धतिची पत्रकार परिषद करण्याची या कलाकारांची पहिलीच वेळ असल्याने त्यांनाही चांगलीच मजा आली. यावेळी या मालिकेचं शिर्षक गीतही रिलीज करण्यात आलं. ही सगळी टीम त्यांच्या सेटवरून म्हणजेच सध्या सेट म्हणून वापरत असलेल्या घरातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लाईव्ह उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलत असताना निर्माते श्रीरंग गोडबोले म्हणाले की, “एरवी शुटिंगसाठी सगळी डिपार्टमेंट आणि माणसं असतात मात्र या मालिकेसाठी कलाकाराच सगळं करत आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीत आव्हान नाही घ्यायचं तर काय घ्यायचं. पण यासाठी टीमचे आभार मानतो.”
यावेळी लीना भागवत म्हटल्या की, “अभिनय माझं आवडतं कार्यक्षेत्र असल्याने घरात बसून शुटिंग करायला मजा येतेय. घरची कामं आवरून आम्ही शुटिंगला सुरुवात करतो. लिखित मटेरियल छान असल्याने काम करायला खूप मजा येत आहे.”तर मंगेश कदम म्हटले की, “सुरुवातीला मी घाबरलो होतो की हे असं कसं शक्य आहे? पण ते शक्य झालं. घराला आम्ही स्टुडिओच समजतो. बेडरुम आमचा मेकअप रूम आणि इतर घर हे सेट.” अभिनेता समीर चौगुले हे या मालिकेचे संवाद लिहीत आहेत. ते यावेळी म्हटले की, “आता लॉकडाउनमध्ये कुणाचा फोन आला की मी शूटमध्ये आहे असं सांगतो तेव्हा छान वाटतं. संवाद लिहीण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे कारण प्रत्येक कॅरेक्टर्स ही स्ट्राँग आहेत.”
सखी गोखले सांगते की, “लंडनमध्ये जरी असलो तरी आमच्या वेळेनुसार आम्हाला शुट करता येत आहे.”
तर सुव्रत सांगतो की, “सगळं आम्हाला करावं लागत असलं तरी आमचे काल्पनिक मेकअप दादा आणि स्पॉट दादा सुद्धा आहेत. या निमित्ताने सगळ्या डिपार्टमेंटचा अनुभव घेता येत आहे.”
या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचं एडिट हे केरळमध्ये असलेला एडिटर करतोय. तर म्युझिक हे कोल्हापुरवरून केलं जातय. सुव्रत आणि सखी लंडनहून या मालिकेसाठी चित्रीकरण करत आहेत. त्यामुळे जगाच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून या मालिकेचं काम होत आहे. या मालिकेत एकूण 16 कलाकार झळकणार आहेत. येत्या 18 मे पासून ही मालिका सोनी मराठीवर पाहता येईल.