अजय देवगण यांची निर्मिती असलेला आणि त्यांच्या प्रमुख भूमिकेने सजलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.म्हणूनच खुद्द अजय देवगण यांनीच तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना तान्हाजी मराठीतून पाहण्याचा आस्वाद घ्यावा असं सांगितलं आहे. कारण, आपल्या मायबोलीत सिनेमा पाहण्याची मजाच काही और असते.
तानाजी मालुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. या शूरवीराने जीवाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. तानाजी मालुसरेंच्या या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हा दैदिप्यमान इतिहास आपल्या मातृभाषेत पाहायला मिळणं ही पर्वणीच म्हणायला हवं. स्टार प्रवाह वाहिनीवर २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा मराठीतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबतच अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली गेली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच सिनेमातली दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे.