स्टार प्रवाहवर २६ जुलैपासून सुरु होणाऱ्या 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत जिजाऊंची भूमिका कोण साकारणार याची कमालीची उत्सुकता होती. छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड. निशिगंधा वाड या इतिहासाच्या अभ्यासक आहेत. त्यामुळे जिजाऊ साकारणं हा अत्यंत सुखद अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अशी पालनकृत, ताठ कण्याची, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे भाग्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इतकी कणखर भूमिका साकारायला मिळणं हा दैवी योग आहे असं निशिगंधा वाड म्हणाल्या.
जवळपास १० वर्षांनंतर निशिगंधा ताई मराठी टेलिव्हिजन करत आहेत. या दमदार कमबॅकसाठी त्या खुपच उत्सुक आहेत. या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना निशिगंधा वाड म्हणाल्या, ‘हे पात्र साकारताना आणि जिजाऊंच्या रुपात उभं करण्यामागे बऱ्याच जणांचे कष्ट आहेत. अगदी लेखकापासून, दिग्दर्शक, मेकअपमनपासून प्रत्येकाची मेहनत आहे. त्यामुळे अभ्यासपूर्वक आलेलं हे पात्र साकारताना मी कुठेही कमी पडू नये यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. जय भवानी जय शिवाजी ही मालिका स्टार प्रवाहचा अभिनव उपक्रम आहे. छत्रपती शिवरायांसाठी समर्पण दिलेल्या शिलेदारांची गोष्ट मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी देखिल या महत्त्वाकांक्षी मालिकेचा अंश आहे.’
स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. या भव्यदिव्य मालिकेतून बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत अजिंक्य देव, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत भूषण प्रधान, नेतोजी पालकरांच्या भूमिकेत कश्पय परुळेकर आणि शिवा काशिदच्या भूमिकेत विशाल निकम अशी दमदार कलाकारांची फौज या प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तेव्हा पाहायला विसरु नका नवी ऐतिहासिक मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ फक्त स्टार प्रवाहवर.