स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अविनाशला पैशांची मदत करण्यासाठी अरुंधतीने समृद्धी बंगला गहाण ठेवला. ही गोष्ट देशमुख कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येकाकडूनच उलट सुलट प्रतिक्रिया मिळाल्या. अनिरुद्ध आणि संजनाने तर समृद्धी बंगला विकण्यासाठीचाच प्रस्ताव मांडला. मात्र या कठीण प्रसंगातही खचून न जाता अरुंधतीने ठामपणे उभं रहायचं ठरवलं आहे. घरात एकीकडे तणावाचं वातावरण असताना आश्रमाच्या दिपोत्सवात अरुंधतीची तिचा कॉलेजचा मित्र आशुतोष केळकरसोबत भेट होते. तिथे अरुंधतीचं गाणं ऐकून आशुतोष भान हरपून बसतो. आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी बिझनेसमन आहे. बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोष हे एकमेकांसमोर येतात.
आशुतोषला अरुंधतीच्या संपर्कात रहायला आवडतंय. देविकाकडून त्याने अरुंधतीबदद्ल सगळी माहिती मिळवलीय. अरुंधतीच्या गाण्याचा आशुतोष खुप मोठा चाहता आहे. आशुतोषच्या गाडीमुळे यशचा छोटा अपघात होतो, त्यामुळे आशुतोष त्याला घरी सोडायला येतो. तेव्हा त्याची आणि अरुंधतीची भेट होते. तो अरुंधतीला थेट त्याच्या म्युझिक अल्बमसाठी पार्श्वगायन करण्याची संधी देतोय, असं आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
तेव्हा अरुंधती आशुतोषची ही गाण्याच्या व्हिडीओची संधी स्विकारणार का, या दोघांमध्ये पुन्हा मैत्रीचं नातं खुलणार का हे येत्या भागात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.