तुम्हाला आठवतंय ती रविवारची सकाळ जेव्हा सर्वांच्या घरी फक्त आधी रामायण व त्यानंतर महाभारत सुरु व्हायचं, आपण टीव्हीसमोरुन हलायचंच नाही असंच ठरवून टाकायचो. किती छान दिवस होते. पौराणिक कथा त्यांचं सार त्यांचा अर्थ नव्या पिढीकडे या मालिकांमुळे पोहचला जायचा. मोठेही मग हे कार्यक्रम आनंदाने व उत्साहाने पाहायचे.
आता करोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान मोदींनी सुध्दा संपूर्ण देश तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे घरात राहा, सुरक्षित राहा हा मार्ग अवलंबण्यापलिकडे आपण काहीच करु शकत नाही. कोणी वाचन करतंय तर कोणी घरकामात बिझी आहे, अनेकांनी वेळ घालवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार केला आहे. पण याच दरम्यान अनेकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणा-या दूरदर्शनवरील 'रामायण' व 'महाभारत' या पौराणिक मालिका पुन्हा सुरु कराव्यात अशा मागण्यांचा जोर वाढवला आहे
. प्रसार भारतीचे मुख्य अधिकारी शशी शेखर प्रेक्षकांच्या या मागणीवर विचार करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले ‘आम्ही मालिका पुन्हा दाखवण्यासाठी मालिकेच्या स्वामित्व हक्क धारकांशी या विषयी चर्चा करत आहोत. तुम्हाला याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल’ असे म्हटले आहे.
Yes we are working on the same with the Rights Holders. Will update shortly. Stay tuned. https://t.co/2Jhjw2qD3s
— Shashi Shekhar (@shashidigital) March 25, 2020
शशी शेखर यांच्या या सकारात्मक ट्विटमुळे प्रेक्षकांना आता लवकरच 'रामायण' व 'महाभारत' यांचा पुन्हा अनुभव घेता येईल, अशी आशा आहे.