By  
on  

विशिष्ट धर्मात जन्माला येणं यात कर्तृत्वाचा भाग नसतो : नवाजुद्दीन सिद्दीकी

बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्त्व एका शब्दांत बांधणं कधीही शक्य नाही. कारण बाळासाहेब उत्तम राजकारणी, उत्तम कलाकार आणि कुशल नेता होते. त्यांची शैली इतरांपेक्षा कैकपटीने वेगळी होती. मराठी माणसाची अस्मिता सतत प्रज्वलित ठेवणारी ज्वाला म्हणजे बाळासाहेब ठाकरे.

साहेबांचा बायोपिक येत्या काही दिवसात प्रदर्शित होईल. या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणा-या नवाजुद्दीन सिद्दीकीसाठी हा अनुभव कसा होता ते पीपिंगमूनसोबत जाणून घेऊ.

नवाज तू ठाकरेमध्ये काम करण्यापूर्वी मांझी: द माऊंटन मॅन आणि मंटो या दोन बायोपिकमध्ये काम केलं आहेस. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फरशी कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे ठाकरे करताना तुझ्या मनात कोणती शंका होती का?

शंका अजिबात नव्हती. पण काळजी मात्र नक्कीच होती कारण पडद्यावर बाळासाहेब साकारणं हे केवळ अभिनयाशी निगडीत नव्हतं तर रसिकांच्या भावेनाची प्रश्न होता. पण माझा स्वत:वर पूर्णपणे विश्वास होता. याशिवाय दिग्दर्शक संजय राऊत साहेबांचीही या कामी चांगली मदत झाली. याशिवाय संपूर्ण टीमनेही मला वेळोवेळी मदत केली. हा रोल माझ्यासाठी आव्हानात्मक असल्याने काम करताना मजा आली. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांच्या कौतुकामुळे आपलं काम चांगलं झाल्याचीही पावती मिळाली.

या सिनेमात काम करण्याआधी तुझं बाळासाहेबांबद्द्ल काय मत होतं? ठाकरेंची व्यक्तिरेखा साकारताना वैयक्तिक मतामध्ये काही बदल झाला का?

मी मागील काळातील बाळासाहेबांशी निगडीत असलेल्या घटनांशी संबंधित नव्हतो. पण बाळासाहेबांचं नाव सगळ्या हिंदुस्थानला माहीत आहे. शुटिंगला सुरुवात करण्याआधी मी त्यांची भाषणं ऐकली होती. त्यानंतर मी त्यांच्याविषयी अधिक जाणून घेतलं. त्यांनी मराठी माणसासाठी केलेलं काम अजोड आहे. मला याची जाणीव सिनेमा करताना वेळोवेळी होत होती.

संजय साहेब म्हणाले की त्यांनी तुझं फ्रिकी अली सिनेमातील काम पाहिलं आणि दोन मिनिटातच ठाकरे सिनेमासाठी तुझी निवड केली. हा सिनेमा तुझी ओळख बनला आहे असं तुला वाटतं का?

फ्रिकी अली हा माझ्यासाठी नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळा सिनेमा होता. मुख्य म्हणजे हा विनोदी सिनेमादेखील होता. पण संजय साहेबांनी या व्यक्तिरेखेत काय पाहिलं ते ठावूक नाही. राऊत साहेब चांगले राजकारणी आहेतच पण त्याशिवाय त्यांच्याकडे कलाकाराची नजर देखील आहे. त्यामुळेच की काय त्यांना माझ्यात असं काहीतरी जाणवलं असावं. त्यामुळेच मी बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय देऊ शकेन असं वाटलं असावं.

या सिनेमानंतर शिवसेनेमध्ये आणि शिवसैनिकामध्ये तुला विशेष मान मिळेल. त्यामुळे पक्षाने तुला लोकसभेसाठी पक्षाचा प्रचार करण्यास सुचवलं तर काय करशील? किंवा हा सिनेमा निवडणुकांवर कितपत प्रभाव पाडू शकतो असं तुला वाटतं?

बाळासाहेबांना निवडणुकांमध्ये कधीच स्वारस्य नव्हतं. तुम्ही हा सिनेमा वर्षाच्या मध्यावर जरी रिलीज केला असता तरी त्याला तितकाच प्रतिसाद मिळाला असता असं मला वाटतं.

या सिनेमानंतर तुझी प्रतिमा शिवसेनेचा स्टार प्रचारक अशी होईल. बॉलिवूडमधील बरेच कलाकार अशा प्रचार मोहिमेमध्ये भाग घेतातही. तु याकडे कशाप्रकारे पाहतोस?

हे बघा तुम्ही याकडे कसं पाहता ते तुमच्यावर अवलंबून आहे. खरं तर मला प्रचाराच्या ऑफर यापूर्वीही आल्या होत्या. पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. आणि राजकारणात जाण्याचा फारसा विचारही सध्यातरी नाही.

तु मुस्लिम धर्माचा आहेस. पण सिनेमात तू अशी व्यक्तिरेखा साकारत आहेस जी मुस्लिमद्वेष्टी आहे. याबद्द्ल तुझं काय मत आहे.

मला वाटतं एखाद्या धर्मात जन्मला येणं म्हणजे तुम्ही त्या धर्मात मोठं योगदान दिलं असा होत नाही. कुठल्या धर्मात जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतंही. मी आता जे काही कमावलंय ते माझ्या अनुभव आणि विचारांच्या देणगीमुळेच. मी मुस्लीम आहे. आणि माझा जन्म मध्यप्रदेशातील बुधना इथे झाला. पण याता माझं कोणतंही कर्तृत्व नाही. मी देशाला अभिमान वाअटेल अशी कामगिरी करू शकलो तर ते माझं कर्तृत्व असेल. माझे सिनेमे विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात पाहिले जातात त्यावेळी त्यांच्यासाथी मी मुस्लीम व्यक्ती नसतो तर भारतीय कलाकार असतो तीच माझी ओळख आहे .

https://www.youtube.com/watch?v=0YR1p3Y2HTU&feature=youtu.be

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive