By  
on  

आयुष्याचा खरा अर्थ सांगून अंतर्मुख करून भावुक करणारा ‘प्रवास’

सिनेमा : ‘प्रवास’

दिग्दर्शक : शशांक उदापूरकर

लेखक : शशांक उदापूरकर

कलाकार : अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, शशांक उदापूरकर, विक्रम गोखले, रजित कपूर, श्रेयस तळपदे

कालावधी : 2 तास 13 मिनिटे

रेटींग : 3 मून्स

 

 

या जगात जन्म घेतल्यापासून आपण सगळेच एका प्रवासात असतो. या प्रवासात विविध चढ उतार येतच असतात. मात्र एका विशिष्ठ वयात पोहोचल्यानंतर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा काय गमावलं आणि काय कमावलं याचा आढावा घेण्याची वेळ येते. अशीच थिमलाईन घेऊन केलेला ‘प्रवास’ हा सिनेमा आहे. ज्यांच्यामुळे हा सिनेमा पाहण्याचा प्रवास सुखकर झाला आहे ते या सिनेमातील नायक-नायिका प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे.

हे दोन्ही अनुभवी आणि दिग्गज कलाकार पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळालेत. दोघांची केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे आणि पडद्यावर दोघांना एकत्र पाहायला छान वाटतयं. खासकरुन अशोक मामांचा विनोदी अंदाज या सिनेमात अनुभवायला मिळतो. सिनेमातील त्यांचे काही सीन तुम्हाला हसवतील तर काही डोळ्यातून टचकन पाणी काढतील.

ज्याने या सिनेसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, लेखक या तिन्ही क्षेत्रात एकाच वेळी पदार्पण केलं होतं, त्या शशांक उदापूरकर याने या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. शिवाय सिनेमात एक महत्त्वाची भूमिकाही साकारली आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा दुसरा सिनेमा आहे. वयाची साठी ओलांडलेल्या पती-पत्नी अभिजीत-लता यांची ही कहाणी आहे. ज्यांचा मुलगा परदेशात असतो. अभिजीत यांना किडणीचा आजार असतो त्यामुळे बऱ्याच कामांसाठी ते आपल्या पत्नीवर अवलंबुन असतात. मात्र या सगळ्यात उतार वयात आजाराने मनात येणार विचार त्यातून आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न याकडे हे दोघं कसे पाहतात आणि त्यात काय काय घडत जातं हे या सिनेमात पाहायला मिळतं.

 

सिनेमात काही सीनमध्ये प्रसिद्ध कलाकारांची पाहुणे कलाकार म्हणून भूमिका पाहायला मिळतात. यात विक्रम गोखले, श्रेयस तळपते, रजीत कपूर, माधव देवचके या कलाकारांच्या अगदी छोट्या मात्र प्रभावी कॅरेक्टर्स आहेत. सिनेमाच्या छायांकनासाठी अनुभवी डीओपी सुरेश देशमाने यांचं कौतुक त्यांनी विविध लोकेशन्सही सुंदर टीपली आहेत.

या सिनेमाला अतिशय सुरेल आणि उत्तम म्युझिकल टीम लाभलीय. गुरु ठाकूर यांचे गीत कानावर पडताच वाह म्हणायला भाग पाडतात. सलीम-सुलेमान यांचं संगीत आणि सोनू निगम, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, हरीहरन यांनी गायलेली गाणी कानांना तृप्त करतात. अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत या सिनेमाला आहे.

 

 

मात्र लेखनाच्या दृष्टीने सिनेमा हा लांबवल्याचं जाणवतं. सिनेमाचा विषय काही टप्प्यांवर हरवलेला जाणवतो. काही सीन्स हे आणखी छान खुलवता आले असते. हा सिनेमा का पाहावा, तर अशोक सराफ-पद्मिनी कोल्हापुरे ही जोडी पडद्यावर एकत्र आल्यावर काय कमाल करते हे पाहायचे असेल, श्रवणीय गाणी ऐकायची असेल, अशोक सराफ यांचा ह्युमरस अंदाज अनुभवायचा असेल तर हा सिनेमा नक्की पाहा. आपल्या आई-वडिलांसोबत, पत्नीसोबत, पतीसोबत, आजी–आजोबांसोबत अनुभवता येईल असा हा फॅमिली सिनेमा आहे. जो तुम्हाला सिनेमागृहातून बाहेर पडताना विचार करायला भाग पाडेल आणि भावुकही करेल.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive