गेले शंभर दिवस महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेल्या पहिला मराठी बिग बॉस कोण होणार हे अखेर जाहिर झाले. सर्वात शक्तिशाली स्पर्धक म्हणून ओळखली जाणारी मेघा धाडे हिनेच बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वत:ची मोहोर उमटवली. ग्रॅंड फिनालेच्या टॉप तीन स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान मेघासोबतच पुष्कर जोग आणि स्मिता गोंदकर यांना मिळाला. त्यानंतर स्मिता घराबाहेर पडली आणि टॉप दोन स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान पुष्कर जोग आणि मेघाने पटकावला. पण या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी अखेर मेघा धाडे विजयी ठरल्याची घोषणा केली. मेघाच्या चाहत्यांमध्ये या बातमीने आनंदाचे वातावरण पसरले आणि एकच जल्लोष झाला.
मागील आठवड्यात बिग बॉसने फिनालेमध्ये सहा स्पर्धकांची निवड केली. यामध्ये मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग आणि सई लोकुर यांनी स्थान मिळवले होते. शंभर दिवस हे सेलिब्रिटी राहिल्याने अनेक नाट्यमय घडामोडी बिग बॉसच्या घरात रंगल्या. नॉमिनेशन कार्य, विविध टास्क आणि रणनिती आखणे यांमुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यात स्पर्धकांनी यश मिळवले.
ग्रॅंड फिनालेचा सोहळा रंगतदार ठरला. घराबाहेर पडलेले स्पर्धक रेशम टिपणीस, जुई गडकरी, ऋजुता धर्माधिकारी, राजेश शृगांरपुरे, सुशांत शेलार यांनी बहारदार परफॉर्मन्स दिले. तर भूषण कडू, आरती सोळंकी आणि नंदकिशोर चौघुले यांच्या स्किटने धम्माल आणली. तर मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग आणि सई लोकुर या स्पर्धकांचे शानदार परफॉर्मन्स घरातच झाले आणि त्यांनी प्रेक्षकांची मनं जिकून घेतली.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरलेल्या मेघाने ‘झुंज’, ‘कसोटी जिंदगी की’, कस्तुरी या मालिकांमध्ये तर ‘मॅटर, ‘मान-सन्मान’ आदी सिनेमांमध्ये भूमिका साकरल्या आहेत.