बिग बॉस मराठी या रिएलिटी शोच्या पहिल्या पर्वात आपलं सौंदर्य आणि बिनधास्त अंदाजामुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. अभिनेता पुष्कर जोग बरोबर असलेल्या ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन निखळ मैत्रीमुळे सईला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. बिग बॉसच्या अंतिम फेरीत धडक मारणा-या सईसोबत दिवाळी सेलिब्रेशननिमित्त पिपींगमून मराठीने खास गप्पा मारल्या.
सई म्हणाली, “ बिग बॉस शो जरी संपला असला तरी सध्या मी अनेक इव्हेंट्सच्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी असल्याने मला कुटुंबाला वेळच देता येत नाही. त्यात मी मुळची मुंबईची नसल्याने मला नेहमीच घरची ओढ सतावते. पण यंदा मात्र मी वेळात वेळ काढून दिवाळीसाठी बेळगावला माझ्या घरी आली आहे. सर्व कुटुंबिय एकत्र जमून आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत. मी आणि माझी चुलत भावंडं ही आमची गॅंग यंदा मनोसोक्त मातीचे किल्ले बनवायचे, खुप फोटो सेशन्स आणि फराळावर यथेच्छ ताव मारणे असा आमचा फुल धम्माल प्लॅन तयार आहे.”
दिवाळीत मजा मस्ती करण्याबरोबरच सईने प्रेक्षकांना आवर्जून एक महत्त्वाचं आवाहनसुध्दा केलं आहे. “दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा सण, पणत्या, आकाशदिवे, रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मिठाई आणि आनंदाची उधळण. पण हा सण साजरा करताना आपण एक भान नक्कीच जपलं पाहिजे ते म्हणजे प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचं. पशू-पक्ष्यांनासुध्दा फटाक्यांमुळे खुप त्रास होतो. वृध्द आणि आजारी लोकांना यामुळे अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच . केवळ फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यापेक्षा ती पर्यावरणपूरक कशी होईल याचा प्रयत्न करा.”
[video width="640" height="352" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/11/WhatsApp-Video-2018-11-05-at-5.59.07-PM.mp4"][/video]