मराठी कलाकार जातील तिथे आपली छाप सोडून येतात. त्यामुळेच कि काय मनोरंजनाचा बाप असलेल्या बॉलिवूडलाही मराठी कलाकार सिनेमात घेण्याचा मोह आवरत नाही. अलीकडेच आलेला सिंबा या सिनेमात जवळपास अकरा मराठी कलाकार होते. मराठी सिनेसृष्टीने आतापर्यंत अनेक दर्जेदार कलाकार बॉलिवूडला दिले आहेत. अमृता सुभाष हे त्यातीलच एक नाव. अमृताने आपल्या अभिनय कौशल्याने आतापर्यंत मराठी रसिकांची मनं जिंकली आहेत. अमृताच्या अभिनयाची छाप बॉलिवूडवरही पडली आहे. त्यामुळेच झोया अख्तरच्या गली बॉयमध्ये तिची वर्णी लागली आहे.
https://www.instagram.com/p/BsbT80xBCqv/?utm_source=ig_web_copy_link
‘हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता म्हणते की, माझं काम योग्य लोकांनी पाहिलं आणि त्याचं फळ मला लगेच मिळालं. झोयाने माझं रमन राघव २.० मधील काम पाहिलं होतं. त्यावरच गली बॉय साठी तिने माझी निवड केली. मी स्वत:ला खुप सुदैवी समजते की, मला झोया आणि टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली.’ अमृताने या सिनेमात रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्या अनुभवाबद्द्ल अमृता म्हणते की, ‘रणवीर खरंच सगळ्यात मिसळून राहणारा कलाकार आहे. त्याला स्टारडमचा अजिबात गर्व नाही. त्याच्याशी व्यक्तिरेखेबाबत चर्चा करताना खुप काही नवं अनुभवण्यास मिळालं.’
झोयाच्या दिग्दर्शन कौशल्याचं कौतुकही तिने केलं आहे. या सिनेमाच्या अनुभवाबाबत अमृता म्हणते की, चांगले लोक तुमच्यासोबत असले की यशासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.’