By  
on  

भाषा कधीही लुप्त होत नाही, तिच्यात बदल होत जातात: अमित्रियान पाटील

सत्या 2’, ‘मन्या दि वंडरबॉय’, ‘332 मुंबई टू इंडिया’, ‘राजवाडे अँड सन्स’ यासारख्या मोजक्या पण गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका करत आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच लक्ष वेधून घेणारा मराठी चित्रपटसृष्टीतला देखणा चेहरा म्हणजे अमित्रियान पाटील. ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या भेटीला आला. अमित्रियान मुळचा अकोल्याचा आहे. इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर तो या क्षेत्रात आला. आज कुसुमाग्रज जयंती अर्थात ‘मराठी राजभाषा दिना’च्या निमित्ताने अमित्रियानने त्याच्या मराठी भाषेविषयीच्या भावना ‘पीपिंगमून’शी बोलताना सांगितल्या आहेत.

तुझं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे. तरीही  मराठी भाषेशी, साहित्याशी तू स्वत:ला कसं जोडून घेतलं आहेस?

उत्तर: खरं म्हणजे माझी पार्श्वभूमी मराठी आहे. विशेष म्हणजे भाषेला व-हाडी टच असल्याने माझ्यासाठी खुपच स्पेशल आहे. मराठी भाषेचे आणि साहित्याचे उत्तम संस्कार माझ्यावर कुणामुळे झाले असतील तर बाबांमुळे. माझ्या बाबांना पु.ल. देशपांडे प्रचंड आवडायचे. त्यांच्याकडे पु.लं.च्या ऑडियो कॅसेट होत्या. त्या मी त्यांच्यासोबत ऐकायचो. त्यामुळे माझ्यावर भाषेचे आणि संवादफेकीचे संस्कार झाले. महाराष्ट्रातील ब-याच ठिकाणांच्या बोलीचा अभ्यास त्यांच्या कॅसेटच्या सहाय्याने मला करता आला. त्याचा उपयोग मला अभिनयात होत आहे.

 

तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत?

उत्तर: मी येत्या काळात एका हिंदी सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे. ‘डर्टी हिरोज’ नावाचा एक सिनेमा येतोय. यात मी, अतुल कुलकर्णी, अरुणोदय सिंह असे कलाकार आहेत. हा सिनेमा इंग्लिशमधील ‘एले कॉन्फिडेंशिअल’ सिनेमाचा रिमेक आहे.

तुला असं वाटतं का की मराठी भाषेचं अस्तित्व धोक्यात आहे किंवा मराठी भाषा लोप पावत आहे?

उत्तर:  मी याबाबतीत पु.ल.चा एक किस्सा आठवतो. ते म्हणायचे की ‘भाषा म्हणजे कोणताही खाद्यपदार्थ नाही जतन करायला, त्यात बदल होणं अपरिहार्य आहे’. त्याचप्रमाणे मलाही असं वाटतं की कोणतीही भाषा नष्ट होत नसते किंवा लोप पावत नसते. अर्थात काळानुसार तिचं स्वरुप मात्र बदलत जातं. शंभर वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे मराठी बोलली जात असे तशी आता बोलली जात नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की भाषा लोप पावली आहे. तिच्यात बदल होत आला आहे.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive