अभिनेत्री तृप्ती तोरडमलने 'सविता दामोदर परांजपे' या सिनेमामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील तीच्या भूमिकेचे सर्वच स्तरांमधून खूप कौतुक झाले. २०१८ वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तृप्तीला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. परंतु तृप्तीने या ऑफर्स नाकारल्या. एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीने यामागची कारणं उघड केली.
''सविता दामोदर परांजपे सिनेमानंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. परंतु ग्लॅमरस भूमिकांमुळे मी हे सिनेमे नाकारले. मी प्रत्येक गोष्टीचा निर्णय विचार करून घेते. चित्रपटाच्या आकड्यापेक्षा उत्तम कामावर मला लक्ष केंद्रीत करायचं आहे. कमी चित्रपट वाट्याला आले तरी चालतील मात्र काम, कथा ही उत्तमच असली पाहिजे'' असं तृप्ती या मुलाखतीत म्हणाली. तृप्तीने अभिनेता सुबोध भावे सोबत 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटात काम केले आहे. आता तृप्ती दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात झळकणार आहे. याबाबतीत तृप्ती म्हणाली,''मी फर्जंद चित्रपट पाहिला होता. फर्जंद सारख्या चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा होती. आता फत्तेशिकस्त सिनेमाच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. 'फत्तेशिकस्त' सिनेमात तृप्ती कोणती भूमिका करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. हा चित्रपट छत्रपती शिवरायांच्या युद्धनितीचे दर्शन घडविणारा असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.