मराठी सिनेविश्वातला 'चॉकलेट बॉय' म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखलं जातं. १४ जून १९९२ रोजी पुण्यात सिद्धार्थ चांदेकरचा जन्म झाला. एस डी कटारिया विद्यालयात सिद्धार्थने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तसेच एस.पी. महाविद्यालयामधून सिद्धार्थने उच्चशिक्षण घेतलं.
२००७ साली 'हमने जिना सिख लिया' या हिंदी सिनेमातून सिद्धार्थने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 'अग्निहोत्र' या मराठी मालिकेतून सिद्धार्थ चांदेकर हे नाव घराघरात पोहोचलं.
२०१० साली आलेल्या अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'झेंडा' या सिनेमातून सिद्धार्थने मराठी सिनेविश्वात पदार्पण केले. त्यानंतर पुढे 'बालगंधर्व', 'दुसरी गोष्ट', 'क्लासमेट', 'ऑनलाईन बिनलाईन', 'बावरे प्रेम हे' या सिनेमात सिद्धार्थने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्या.
२०१८ साली आलेल्या 'गुलाबजाम' या सिनेमात वेगळी भूमिका साकारून सिद्धार्थने आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन त्याच्या चाहत्यांना घडवलं.
मराठी सिनेविश्वासोबतच सिद्धार्थने मराठी रंगभूमीवर सुद्धा अभिनय केला आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' या नाटकांमध्ये सिद्धार्थने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
सिद्धार्थने मराठीत अनेक पुरस्कार सोहळ्याने आणि कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. त्यामुळे एक उत्तम निवेदक म्हणून सुद्धा सिद्धार्थची ओळख आहे.
अलीकडेच 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसीरिजमध्ये सिद्धार्थने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं.
जानेवारी २०१९मध्ये सिद्धार्थने त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री मिताली मयेकर हिच्याशी साखरपुडा केला.
सध्या स्टार प्रवाहावरील 'जिवलगा' या मालिकेत सिद्धार्थ विशेष भूमिका साकारत आहे. लवकरच सिद्धार्थ 'मिस यू मिस्टर' या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थचा हा नवा सिनेमा पाहण्यास त्याचे चाहते उत्सुक आहेत.