गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडणारी प्रेक्षकांची लाडकी मालिका अस्मिता आठवतेय ना.....आठवणारच ..त्यातली अस्मिता आणि तिची डॅशिंग टीम एखाद्या गुन्हाच्या शोध लावण्यासाठी जीवाची बाजी लावायचे. त्यामुळे अल्पावधितच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.यात अस्मिताची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री मयुरी वाघ आणि याच मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत असलेला अभिनेता पियुष रानडे सेटवरच एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि 2016 रोजी त्यांनी लग्नगाठ बांंधत आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या.
पण आता एक वेगळीच माहिती समोर आली आहे. सूत्रांनी पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह माहितीनुसार, सध्या मयुरी आणि पती पियुष यांच्यात काहीच आलबेल नसून लवकरच हे सेलिब्रटी कपल कायदेशीर घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. परंतु याबाबतची सविस्त माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
विशेष म्हणजे मयुरीचे हे पहिलेच तर पियुषचे हे दुसरे लग्न आहे. खुप थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा बडोदा येथे पार पडला होता. यावेळी त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी त्यांचे सिनेसृष्टीतील काही जवळचे मित्र-मैत्रिणी सामिल झाले होते. मेहंदी, हळद, लग्न, रिसेप्शन असा हा खुपच शानदार सोहळा रंगला.
मयुरी वाघ सध्या सोनी मराठीवरील 'ती फुलराणी' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय तर पियुष रानडे हा स्टार प्रवाहवरील 'साथ दे तू मला' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यापूर्वी त्याने 'अंजली' या झी युवावरील लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.