कॅन्सरच्या विळख्यात असलेल्या कलाकारांची नावं आतापर्यंत बॉलिवूडपर्यंत मर्यादित होती. पण आता मराठी कलाकारांमध्येही कॅन्सर आपले हात पाय पसरू लागला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी अलीकडेच कॅन्सरशी यशस्वीरित्या दोन हात केले आहेत. मुळात शरद पोंक्षे यांना कॅन्सर झाला आहे ही बाब खासगी रहावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे कॅन्सरशी सहा महिने झुंज दिल्यानंतर नुकतीच शरद यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकाच्या तालीमीसाठी हजेरी लावली आहे.
डिसेंबरमध्ये शरद यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. सतत ताप आणि कंबरेच्या भागातील गाठींनी शरद यांच्या कॅन्सरचं निदान केलं. शरद यांना कॅन्सरमधून बाहेर येण्यासाठी सावरकरांच्या साहित्याने मदत केली. हिमालयाची सावली या नाटकात शरद यांची महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक राजेश देशपांडे हे देखील शरद यांचे उपचार पूर्ण होईपर्यंत थांबले होते. शरद आता या नाटकातून रसिकांच्या भेटीला येतीलच. याशिवाय ते अग्निहोत्र 2 या मालिकेतही दिसतील.