'गोंद्या आले रे’च्या शुटिंगवेळी पल्लवी पाटीलने केली तिच्या 'या' समस्येवर मात

By  
on  

अभिनेत्री पल्लवी पाटीलला स्वच्छतेची खूप आवड आहे. खरं तर, स्वच्छतेची आवड ही चांगली समजली जाते. पण अती स्वच्छतेची आवड एक प्रकारची OCD (Obsessive Compulsive Disorder) गणली जाते. अभिनेत्री पल्लवी पाटीलला अशा पध्दतीने स्वच्छतेची OCD आहे, हे ‘गोंद्या आला रे’ ह्या वेबसीरिजच्या चित्रीकरणावेळी समोर आलं.

‘गोंद्या आला रे’मध्ये ‘दुर्गाबाई दामोदर चापेकर’ ह्या भूमिकेत पल्लवी पाटील दिसणार आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील ह्याविषयी म्हणते, “आमच्या वेबसीरिजचे शुटिंग भोरमध्ये झाले आहे. भोरमधल्या गावातल्या लहान घरांमध्ये जाऊन आम्ही चित्रीकरण केले. पुर्वीच्या बायका पायात चप्पल न घालता चालायच्या. त्यामुळे मलाही दिग्दर्शक अंकुर काकतकरने अनवाणीच राहायला सांगितले होते. त्याला वास्तववादी चित्रीकरण करायचे असल्याने तो मला दिवसभर सेटवरही तसेच फिरायला सांगायचा.”

ती पुढे सांगते, “जुन्या घरांमध्ये आम्ही चित्रीकरण करत असल्याने तिथे अर्थातच माती होती. आणि मला स्वच्छतेची OCD असल्याकारणाने जरा चालले की, पाय खराब होतात, असे वाटून मी लगेच पाय धुवायचे. हे चुकीचे आहे, हे जाणूनही माझे असे वागणे, एक अख्खा दिवस चालले. पण मग दुसऱ्या दिवशी मी पायाकडे दुर्लक्ष करायचा निश्चय केला, आणि दिवसभर तशीच राहिले. मग हळूहळू मातीत अनवाणी फिरायचा प्रयत्न केला.”

पल्लवी म्हणते, “खरं तर, आम्हा आजच्या जनरेशनला समानतेची शिकवण असल्याने, मला सुरूवातीला तर ‘बायकांनी चप्पल घालायची नाही.’ हेच स्वत:ला मुश्कीलीने पटवून द्यावं लागलं. चित्रीकरणाअगोदर फोटोशूटच्यावेळी माझे पती झालेल्या भूषण प्रधानला चप्पल घालायची होती. आणि मला चप्पल न घालताच उभे राहायचे होते. त्यावेळीही स्त्रीवादी मनाला आवर घालावा लागला. पण विविध भूमिका वास्तववादीपणे रंगवणं, हे आमचं कामचं आहे. आणि मला विश्वास आहे, की, मी साकारलेली दुर्गाबाई रसिकांना आवडेल.”

'गोंद्या आले रे' ही वेबसिरीज येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

Recommended

Loading...
Share