By  
on  

या कारणासाठी ललित प्रभाकरला आवडतो पुणे मुक्काम

अभिनेता ललित प्रभाकर हा लँडमार्क फिल्म्स, विधी कासलीवाल निर्मित ’मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित टाकळकर यांनी केले आहे. या चित्रपटाच्या पूर्वतयारीसाठी तीन महिन्यांची कार्यशाळा पुण्यात पार पडली. आपल्या कामाप्रती स्वतःला वाहून घेण्याची सवय आणि या चित्रपटाची कथा त्याच्या मनाला भावल्यामुळे  ललितने पुण्यात एक महिना अधिक घालवला. तसेच आपल्या इतर कामांमुळे लक्ष विचलित होऊ न देता आपल्या नवीन भूमिकेवर लक्ष केंद्रित व्हावे असाही यामागे ललितचा हेतू होता. केवळ आवश्यक त्या दिवशी मुंबईहून पुण्याला न येता संपूर्ण वेळ पुण्यात राहणे ललितने पसंत केले. 

याबद्दल बोलताना ललित म्हणाला, ''माझ्या मते चित्रपट म्हणजे मनाचे लग्न होय, त्यात दोघांची मने जुळणे महत्वाचे असते त्याप्रमाणे मोहित आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्याने आमची मने जुळण्यासाठी आम्ही लिव्ह इन सारखे एकत्र राहिलो, हा चित्रपटाच्या प्रक्रियेचा महत्वपूर्ण भाग होता. मोहित हा एक अतिशय चांगला होस्ट आणि अत्यंत सर्जनशील दिग्दर्शक आहे. जेव्हा तो त्याच्या प्री-प्रॉडक्शनच्या कामांपासून मोकळा व्हायचा तेव्हा तो प्रत्येक दृश्य आणि संवादा पलीकडील चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर बसायचा. त्यात आम्ही दोघेही खवय्ये असल्यामुळे आम्ही एका वेगळ्याच पातळीवर एकमेकांशी जोडले गेले होतो. माझ्या मते खाद्यपदार्थ किंवा जेवणामध्ये लोकांना एकत्र बांधण्याची ताकद आहे. जेव्हा आपण दररोज एखाद्याबरोबर जेवतो, तेव्हा आपण त्याला अधिक जवळून ओळखायला लागतो. या कार्यशाळेमुळे मी माझ्या काही गोष्टी विसरून नव्याने शिकलो हे मला माझ्या भूमिकेसाठी फायदेशीर ठरले. दरम्यान, मला पुणे शहर आवडते, या चित्रपटाच्या निमित्ताने पुण्यात संपूर्ण टीमशी माझी चांगली गट्टी जमली. यामुळे हा संपूर्ण काळ माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरला.''

शहरी जीवनातील नाते संबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे ललित सोबत दिसणार आहेत.  सागर देशमुख देखील महत्वपूर्ण भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

 मोहित टाकळकर यांची ओळख नाट्य क्षेत्रात विविध पुरस्कार मिळवणारे नाटककार अशी आहे, तर विधि कासलीवाल यांची ओळख आशय संपन्न व्यावसायिक चित्रपटांच्या निर्मात्या अशी आहे. ‘मीडियम स्पाइसी’ च्या निमित्ताने हे दोघे एकत्र येत असल्याने सर्वांच्या नजरा या कलाकृतीकडे असतील हे नक्की.

Recommended

PeepingMoon Exclusive