By  
on  

माझ्या आयुष्यात बाप्पाचं स्थान वेगळं: सायली संजीव

माझ्या आयुष्यात बाप्पाचं स्थान हे सगळ्यात उच्च आहे. बाप्पा आणि माझ्या नात्याबाबत सांगायचे, तर त्या मागे एक कारण आहे. मी आठवीत असताना माझे आजोबा वारले  होते. तोपर्यंत मी तशी नास्तिक होते. माझा या गोष्टींवर फारसा विश्वासच नव्हता. मात्र आजोबा गेल्यानंतर मला काही गोष्टी आपसूकच जाणवू लागल्या आणि अचानक माझ्यात गणपती बाप्पाबद्दल ओढ निर्माण झाली. इतकी, की मी अक्षरशः गप्पा मारायचे बाप्पासोबत. त्यामुळे आई-बाबासुद्धा चकित झाले होते. आतापर्यंत देवाला न मानणारी मी, अचानक देवाविषयी इतकी भक्ती कशी निर्माण झाली माझ्यात? हे कसं झालं हे मला सुद्धा माहित नाही. परंतु बाप्पा आणि माझ्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे.

सगळ्यांनाच गणपती खूप जवळचा वाटतो. माझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे सकारात्मक ऊर्जा देणारा एक स्रोत आहे. माझ्या घरी सात दिवसांचा गणपती असतो. पूर्वी आमच्याकडे खूप सोवळं पाळायचे, जे आजही पाळले जाते. फक्त पुरुषांनीच गणेशाची प्राणप्रतिष्ठापना  करावी, अशा पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला मात्र मी खंड दिला. त्यासाठी मी घरी भांडले, आई - बाबांकडे हट्ट केला आणि अखेर मी जिंकले. बाप्पाची माझ्याकडून प्राणप्रतिष्ठा होणारे हे पाचवे वर्षं आहे. आमच्याकडे गौरीही असते. त्यामुळे गौरी -गणपती खूप जोरदार साजरे होतात. अर्थातच सगळं हे इको फ्रेंडली असते.

मी गेल्या तीन वर्षांपासून फक्त विटांचा वापर करून जी सजावट करता येईल, ती करते. बाप्पाची माझ्यावर भरपूर कृपा आहे. चांगल्या -वाईट प्रत्येक प्रसंगात तो माझ्या पाठीशी असतो. माझ्या प्रत्येक निर्णयात तो मला सद्बुद्धी देतो, जेणे करून चुकीच्या निर्णयापासून मी लगेच 'यु टर्न'घेऊ शकेन. त्याच्यामुळेच माझ्या पहिल्या 'यु टर्न' या वेबसिरीजबाबतीतही अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. त्याच्याच  कृपेने मला आजपर्यंत अनेक चांगली कामं मिळाली, चांगली माणसं मिळाली. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात, अनेक वेगवेगळ्या माध्यमात मला काम करण्याची संधी मिळाली. त्याचा आशिर्वाद पुढेही माझ्यावर असाच राहू दे.

Recommended

PeepingMoon Exclusive