प्रिया बापट ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत वावरणारी गुणी अभिनेत्री. प्रियाने अलीकडेच 'सिटी ऑफ ड्रीम्स', 'आणि काय हवं?' यांसारख्या वेबसीरिजमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. तसेच प्रियाने 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकातून निर्मिती क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले आहे.
बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करणा-या प्रिया बापटचा इथपर्यंतचा प्रवास फारच सुरेख आहे. ‘दे धमाल’ या मालिकेद्वारे बालकलाकर म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणा-या प्रियाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक मालिका, नाटक आणि मग सिनेमा असा चतुरस्त्र प्रवास करत सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेत्री असं बिरुद मिरवण्यात यश मिळवलं. प्रियाचा आज 18 सप्टेंबर हा वाढदिवस.
‘शुभं करोती’ या झी मराठीवरील मालिकेमुळे प्रिया घराघरांत लोकप्रिय झाली. तर तिची प्रमुख भूमिका असलेलं ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक सुपरहिट ठरलं. मी शिवाजीराजे भोसले सिनेमात वडिलांसोबत ताठ मानेने मराठी माणसावर होणा-या अन्याविरुध्द संघर्ष करणा-या तरुणीची भूमिका साकारुन प्रियाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तर ‘काकस्पर्श’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमात स्वातंत्र्यपूर्व काळातील बालविवाहामुळे विधवा झालेल्या तरुणीची भूमिका साकारुन आपल्या अभिनयाची एक वेगळीच चुणूक दाखवून दिली.
‘हॅप्पी जर्नी’ सिनेमातील स्वर्गवासी झालेली आणि आपल्या अपु-या इच्छा पूर्ण करण्यासाठी भावाकडे तगादा लावणारी गोड, लाघवी आणि अल्लड बहिण साकारुन प्रियाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.‘टाईमप्लिज’, ‘टाईमपास- २’, ‘गच्ची’, ‘वजनदार’,‘आम्ही दोघी’ हे तिचे सिनेमे प्रेक्षकांना प्रचंड भावले.
मराठीसोबतच प्रियाने हिंदीतही आपली झलक दाखवली. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये लहान भूमिका साकरल्या. अभिनयासोबतच प्रियाला फिरण्याची प्रचंड आवड आहे. ती नेहमीच शूटींगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत जगभर प्रवास करते. तिने ट्रॅव्हल शोसुध्दा केले आहेत. ‘आम्ही ट्रॅव्हलकर’ या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन तिने जगाची भ्रमंती करत केले. तसंच महत्त्वाचं म्हणजे प्रिया नेहमीच सोशल मिडीया अकाऊंटवरुन आपल्या विविध लूक्सचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या या ग्लॅमरस लूक्सना प्रचंड हिट्स देत चाहतेसुध्दा वेहमीच पसंती दर्शवतात.
मुन्नाभाई एम.बी.बी.एसनंतर प्रियाला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफरही आल्या होत्या. पण या दरम्यान प्रिया महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होती. विशेष म्हणजे या दरम्यान तिला शाहरूखसोबत चक डे इंडियामध्ये चमकण्याची संधीही आली होती. पण शिक्षण पूर्ण करायचं असल्याने तिने ही ऑफ़र नाकारली होती. ही ऑफ़र तिने स्वीकारली असती तर हिंदी सिनेमात आणखी एका मराठी कलाकाराचा दर्जेदार अभिनय पाहता आला असता.
मराठी सिनेसृष्टीतील या गुणी अभिनेत्रीला म्हणजेच प्रिया बापटला पिपींगमून मराठीतर्फे वाढदिवसानिमित्त आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा !