विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज 2' सिनेमाला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांमध्ये 'बॉईज 2' ने बॉक्स ऑफिसवर 5. 11 कोटींचा गल्ला कमावला आहे. ज्यात फ्रायडे ओपनिंग 1.30 कोटी , शनिवारी 1.61 कोटी आणि रविवारी 2.20 कोटींचा समावेश आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत,अवधूत गुप्ते ह्यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या हा सिनेमा दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळतोय.
या संदर्भात करण्यात आलेल्या थिएटर व्हिजीटदरम्यान प्रथमेश सरतापे नावाचा एक अनोखा चाहता सिनेमाच्या टीमला दिसला. सामान्य प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या सिनेमागृहात प्रथमेश अंध असूनदेखील 'बॉईज 2' चा मनमुराद आनंद लुटत असताना त्यांना दिसून आला. त्यामुळे, सिनेमा संपल्यानंतर त्याला भेटण्याचा मोह'बॉईज 2' च्या टीमला आवरता आला नाही. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड या प्रमुख कलाकारांसोबत दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी प्रथमेशची भेट घेतली.'बॉईज 2' ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी त्याचे आभारदेखील मानले. प्रथमेश हा एक उत्तम सिनेश्रोता असून, त्याने आतापर्यंत अनेक सिनेमांचा आस्वाद घेतला आहे. गतवर्षीचा 'बॉईज' सिनेमा त्याला भरपूर आवडला होता आणि त्यामुळेच त्याला 'बॉईज 2' पाहण्याची इच्छा होती.
याबद्दल बोलताना, सिनेमा प्रदर्शित होऊन काही दिवसच झाले आहेत. यापुढे आमचा सिनेमा चालेल कि नाही आम्हाला माहित नाही, पण प्रथमेशला आमचा सिनेमा आवडला हेच आमच्या सिनेमाचं यश आहे. कितीही कोटींचा धंदा केला, तरी प्रथमेशला झालेला आनंद हाच आमच्यासाठी सिनेमा सुपरहिट झाल्याचं प्रतीक आहे', अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक विशाल देवरुखकर देतात.
https://twitter.com/BoyzMarathiFilm/status/1049194330261528577
सुपरहिट 'बॉईज' नंतर आता 'बॉईज 2' चा देखील डंका सर्वत्र वाजत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या सिनेमाचे ३७५ शोज सुरु असून, यावर्षीच्या हिट सिनेमांच्या यादीत 'बॉईज 2' चा समावेशदेखील झाला आहे.
कॉलेज तरुणाईचे भावविश्व मांडणाऱ्या 'बॉईज 2' सिनेमाला ऋषीकेश कोळीचे संवाद लाभले आहेत. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' च्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, महाराष्ट्रात हाऊसफुल होत असलेल्या 'बॉईज 2' या सिनेमाचे इरॉस इंटरनॅशलद्वारे जागतिक वितरणदेखील केलं जात आहे.