सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास घडवणा-या दिग्दर्शक नागराज मंजुळेंची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'नाळ' या पहिल्याच सिनेमातील पहिलं -वहिलं गाणं नुकतंच उलगडलं आहे. एका 7 ते 8 वर्षाच्या गावात राहणा-या लहान मुलाचं भावविश्व या गाण्यातून उलगडतंय. रविवार असल्याने तो आपल्या आईकडे- खेळण्या बागडण्याची लाडीक परवानगी मागताना दिसतोय. मग आईसुध्दा थोडेसे आढेवेढे घेत त्याला परवानगी देते आणि मग तो धूम ठोकतो, असं मनमोहक व हद्यस्पर्शी चित्रण गाण्यात पाहायला मिळतंय.
ए.व्ही प्रफुलचंद्र यांचे शब्द आणि संगीत लाभलेल्या या गाण्याला गायक जायस कुमार यांनी स्वरबध्द केले आहे.
काही दिवसांपूर्वीच नागराज मंजुळे यांनीच खुद्द या सिनेमाबाबत फेसबुक पोस्टव्दारे माहिती दिली होती. “माझा पहिला चित्रपट जो मी निर्माण केला नि प्रस्तुत करत आहे. माझा मित्र नि सैराटचा कॅमेरामन सुधाकर रेड्डीने हा दिग्दर्शित केला आहे. माझ्याच मनातली गोष्ट सुधाकर सांगतोय. नितीन वैद्य,विराज लोंढे,निखिल वराडकर, प्रशांत पेठे हे या निर्माणातील सोबती आहेतच. मंगेश कुलकर्णी आणि झी स्टुडिओज टीममुळेच हे शक्य होत आहे.झी स्टुडिओज, मृदगंध फिल्म्स नि आटपाट चिअर्स !!!”, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं .
https://youtu.be/3x3mu3WEJw0
येत्या 16 नोव्हेंबर रोजी नागराज मंजुळे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला ‘नाळ’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.