दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या आगामी 'पॉंडीचेरी' सिनेमाची सिनेसृष्टीत बरीच चर्चा सुरु आहे. यासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे स्मार्टफोनवर चित्रित होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर नुकतंच अभिनेता वैभव तत्ववादीने आणि सई ताम्हणकरने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. दूरवर राहणा-या कुटुंबाची गोष्ट, असं याचं कॅप्शन आहे. या सिनेमात सई ताम्हणकर आणि वैभव ही जोडी प्रथमच एकत्र झळकतेय. सई आणि वैभवसोबतच या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि नीना कुलकर्णी व अभिनेते महेश मांजरेकरसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
आजपासून 'पॉंडीचेरी' सिनेमाच्या शुटींगचा शुभमुहूर्त झाला. तगडी स्टारकास्ट आणि स्मार्टफोनवर चित्रित होणारा सिनेमा यामुळे सर्वांनाच सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तेजस मोडक लिखीत या सिनेमाची निर्मिती निल पटेल यांनी केली आहे.
पाँडेचरी सिनेमाविषयी सई ताम्हणकर म्हणते, “ही पहिली फिल्म आहे जी आयफोनवर शूट करण्यात येणार आहे. माझ्या भूमिकेचा लूक खूप नॅचरल आहे. नो-मेकअप, नो-हेअरस्टाइल लूकमध्ये मी ह्यात दिसेन. संपूर्ण चित्रपट पाँडेचरीत चित्रीत होईल. सिनेमाची प्रोसेस मी एवढी एन्जॉय करतेय की, पहिल्यांदाच एखाद्या कार्यशाळेला जात असल्यासारखी छान भावना आहे. प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात अशी फिल्म यायला हवी, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्टझोनमधून बाहेर निघून काहीतरी वेगळं करता. त्यामूळे सध्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मी खूप उत्सुक आहे.”
सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर ह्याची ही एकत्र दूसरी फिल्म आहे. ह्याअगोदर 2016मध्ये सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने काम केले होते. सिनेमातली भूमिका चांगली वठवता यावी, ह्यासाठी सईने 10-15 किलो वजनही वाढवले होते.
https://twitter.com/sachinkundalkar/status/1091207777983156224
आता तीन वर्षांनी दोघेही एकत्र काम करत आहेत. त्यात सईचा नो-मेकअप रिएलिस्टिक लूक सईच्या ह्या नव्या भूमिकेविषयी उत्कंठा वाढवणारा आहे. त्यामूळे पाँडेचरीविषयी सध्या सईच्या चाहत्यांना आतूरता आहे.
दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचे सिनेमे म्हणजे नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळणार यात शंका नाही.
https://www.instagram.com/p/BrejZxRFxh6/?utm_source=ig_embed