PeepingMoon Exclusive: अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमात चेहरा न दाखवता फक्त डोळ्यांतून अभिनय केला"

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. 'माझ्या नवऱ्याची बायको' मधील माया या भूमिकेमुळे रुचिरा घराघरांत पोहोचली. या मालिकेनंतर रुचिराने काही मराठी सिनेमांत काम केले. यानंतर रुचिरा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. सुदर्शन गमरे यांच्या ‘हेमोलिम्फ’ या सिनेमात अभिनेत्री रुचिरा जाधव झळकणार आहे. 'हेमोलिम्फ' हा अब्दुल वाहिद शेख या शिक्षकाच्या जीवनावर आधारित सिनेमा असून या सिनेमात रुचिराने अब्दुल वाहिद शेखची पत्नी साजिदा शेखची भूमिका साकारली आहे.

'पिपिंगमून मराठी'ला दिलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत, आपल्या हिंदीतल्या पहिल्या वाहिल्या कामाविषयी अभिनेत्री रुचिरा जाधव म्हणाली, "मी हिंदी आणि मराठी अश्या दोन्ही रंगभूमीवर काम केलं आहे. तसंच 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमधील माझं काम बघून दिग्दर्शक सुदर्शन यांच्याकडून मला या भूमिकेसाठी विचारण्यात आले. माझं काम दिग्दर्शकांनी अगोदरचं बघितलं असल्यामुळे त्यांनी माझी कुठलीही ऑडिशन न घेता मला या भूमिकेसाठी जवळपास निश्चितचं केलं होतं. आणि मला सुद्धा ही भूमिका आणि फिल्म आवडली होती, त्यामुळे मी या सिनेमासाठी होकार दिला."

पूर्ण वेळ बुरखा घातल्यामुळे या संपूर्ण सिनेमात रुचिराचे फक्त डोळे दिसणार आहेत. त्यामुळे तिच्यासाठी ही भूमिका थोडी वेगळी होती, याबद्दल बोलताना रुचिरा म्हणते, "दिग्दर्शकांनी या सिनेमाची कथा सांगतानाच असं सांगितलं होतं की पूर्ण सिनेमात कुठेही माझा चेहरा दिसणार नाहीये. कारण या सिनेमातील साजिदाचा खरा चेहरा आतापर्यंत लोकांनी बघितला नाहीये, त्यामुळे या भूमिकेची गरज म्हणून मी पूर्ण सिनेमात चेहरा न दाखवता फक्त देहबोली आणि डोळ्यांतून अभिनय केला आहे आणि दिग्दर्शक सुद्धा अश्याच एका चेहऱ्याच्या शोधात होते, जिचे डोळे खूप बोलके असणे गरजेचे होते आणि ते माझे आहेत असं दिग्दर्शकांना वाटतं होतं. अश्याप्रकारे मी या सिनेमाचा भाग झाले."

या वेगळ्या भूमिकेसाठी रुचिराने घेतलेल्या मेहनतीविषयी रुचिरा म्हणाली, "मी करत असलेली भूमिका एक मुस्लिम स्त्री आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी मी उर्दू भाषा शिकले. एरव्ही एखाद्या सिनेमात अभिनेत्री दिसण्यासाठी मेहनत घेतली जाते. पण इथे दिग्दर्शकांनी माझ्या न दिसण्यासाठी मेहनत घेऊन अगदी नैसर्गिकरित्या माझ्याकडून काम करवून घेतलं." हिंदीत काम करण्याच्या अनुभवाविषयी रुचिरा म्हणाली की, "मराठी असो वा हिंदी. मी दोन्हीकडे काम करताना मी माझे १००% देऊन काम करते. पण या सिनेमात काम करताना माझ्यात काही बदल झाले आहेत, जे माझ्यासाठी वैयक्तिकरित्या आवश्यक आहेत. हिंदी  सिनेमात काम करताना आपल्या कक्षा काही प्रमाणात मोठ्या होतात. ज्या कलाकार म्हणून गरजेच्या असतात."

याचबरोबर रुचिराच्या आगामी प्रोजेक्त बद्दल सांगायचे झाले तर, रुचिराचे लवरकरच २ सिनेमे येणार आहेत ज्यापैकी 'बाबू' या सिनेमाची घोषणा झाली आहे. ज्यात ती अभिनेता अंकित मोहन सोबत काम करत आहे. तर दुसऱ्या सिनेमाबद्दल अद्याप काही सांगू शकत नाही." असं ती म्हणाली. तर तिचे २ अल्बम सॉंग्स देखील येणार आहेत, ज्यात १ हिंदी तर १ मराठी गाणं आहे. रुचिराच्या 'हेमोलिम्फ' या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन सुदर्शन गमरे यांनी केले असून हा सिनेमा येत्या २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share